अ‍ॅपशहर

New year party: थर्टी फर्स्टला मुंबईत कठोर निर्बंध लादणार का, महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

राज्यात रविवारी ओमिक्रॉनचे ८ नवे रुग्ण आढळले असताना आज पुन्हा रुग्ण नवे रुग्ण आढळल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणात आढळले होते.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2021, 2:26 pm
मुंबई: राज्यात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील नववर्षाच्या पूर्वसंध्येला होऊ घातलेल्या सेलिब्रेशनविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. गर्दी टाळण्यासाठी पालिका नाताळ आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला कठोर निर्बंध लागू करणार का, अशी शंका अनेकांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (New year celebration) मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच नियमावली जारी केली आहे. त्यामुळे या काळात पार्ट्यांवर आणखी कठोर निर्बंध लादण्याची गरज नाही. फक्त लोकांनी मुंबई पोलीस आणि पालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर असलेले कठोर निर्बंधाचे सावट पूर्णपणे दूर झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम BMC New year
पालिकेने गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 31 डिसेंबरला सभागृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस फक्त ५० टक्के क्षमतेनेच चालवण्याची अट घातली आहे.


पालिकेने गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 31 डिसेंबरला सभागृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस फक्त ५० टक्के क्षमतेनेच चालवण्याची अट घातली आहे. 31 डिसेंबरला मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. नाताळ, नववर्ष पार्ट्यांवर अधिक करडी नजर ठेवण्यात येणार असून, नियमांचे पालन होत नसल्यास कठोर कारवाई होणार आहे. त्यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागात दोन यानुसार ४८ पथके तैनात केली आहेत. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात पालिकेकडून दोन टेहळणी पथके तैनात केली जातील. वॉर्ड मोठा असल्यास आणि गरज पडल्यास चार पथके तैनात केली जातील. ही पथके सर्व ठिकाणी नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवून असतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली होती.

राज्यात रविवारी ओमिक्रॉनचे (Omicron) ८ नवे रुग्ण आढळले असताना आज पुन्हा रुग्ण नवे रुग्ण आढळल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ओमिक्रॉनच्या ६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणात आढळले असून पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. या बरोबरच राज्यातील एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ५४ वर पोहोचली आहे.

राज्यातील ओमिक्रॉनची बाधा झालेल्या ५४ रुग्णांपैकी सर्वात जास्त २२ रुग्ण मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये ११, पुणे ग्रामीणमध्ये ७, पुणे महापालिका क्षेत्रात ३,साताऱ्यात ३, कल्याण डोंबिवलीत २, उस्मानाबादमध्ये २ तर, बुलडाणा, नागपूर, लातूर आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या ५४ रुग्णांपैकी एकूण २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महत्वाचे लेख