अ‍ॅपशहर

तन्मय भट्ट व्हिडिओच्या चौकशीचे आदेश

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचा अपमान करणाऱ्या तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी आज दिले आहेत. शिवसेनेनंही तन्मय भट्टविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Maharashtra Times 30 May 2016, 1:41 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cp orders inquiry of tanmay bhats video
तन्मय भट्ट व्हिडिओच्या चौकशीचे आदेश


भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचा अपमान करणाऱ्या तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी आज दिले आहेत. या व्हिडिओवरून उसळलेला संताप आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी हे प्रकरण विशेष शाखेकडे सोपवलंय.

दुसरीकडे, शिवसेनेनंही तन्मय भट्टविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तन्मयने माफी मागून काही होणार नाही; त्याच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची अत्यंत हीन दर्जाची टिंगल करणारे दोन व्हिडिओ एआरबी रोस्टच्या तन्मय भट्टने दोन महिन्यांपूर्वी टाकले होते. ते व्हायरल झाल्याने सचिन आणि दीदींचे देशभरातील चाहते संतापले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर तन्मयला लक्ष्य केलंय. भारतरत्नांचा अपमान करणाऱ्या तन्मयवर राजकीय पक्षही तुटून पडले असून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.


स्वतःच्या बोगस प्रसिद्धीसाठी मानसिक विकृत भावनेतून तन्मय भट्टने हा व्हिडिओ तयार केला आहे. दोन आदरणीय व्यक्तींवर अशी अश्लाघ्य टीका अत्यंत चुकीची आहे. स्त्री म्हणूनही त्याने लतादीदींचा अपमान केला आहे. या चुकीसाठी माफी पुरेशी नसून त्याच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, असं पत्र आमदार नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. तर, आमदार आशीष शेलार यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांशी फोनवरून चर्चा करून हीच मागणी केलीय. त्यानंतर आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे हे व्हिडिओ तन्मय भट्टला भलतेच महागात पडू शकतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज