अ‍ॅपशहर

पहाटे गारठा; दिवसा चटके

वाढलेली आर्द्रता आणि ३५ अंशांपर्यंत पोहोचलेले तापमान अनुभवल्यानंतर गेले दोन दिवस मुंबईकरांना घामाघूम होण्यापासून स्वतःचा बचाव करता आला आहे. मुंबईच्या कमाल तापमानात बुधवारी आणखी घट दिसून आली.

Maharashtra Times 15 Nov 2018, 5:42 am
मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cold-wave


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

वाढलेली आर्द्रता आणि ३५ अंशांपर्यंत पोहोचलेले तापमान अनुभवल्यानंतर गेले दोन दिवस मुंबईकरांना घामाघूम होण्यापासून स्वतःचा बचाव करता आला आहे. मुंबईच्या कमाल तापमानात बुधवारी आणखी घट दिसून आली. बुधवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर कुलाबा येथे कमाल तापमान ३१.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मुंबईचे किमान तापमान बुधवारी सांताक्रूझ येथे २०.४ अंश सेल्सिअस होते. केवळ मुंबईच नाही, तर राज्यभरात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट आढळून आली आहे. कमाल तापमानाचा पारा मात्र फारसा उतरलेला नाही. त्यामुळे राज्यभरात पहाटेच्या वेळी गारठा आणि दिवसभर उन्हाचा प्रभाव जाणवत आहे.

बुधवारी राज्यात नागपूर येथे सर्वात कमी किमान तापमानाची (१२ अंश) नोंद झाली. तर, सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ३५.६ अंश सेल्सिअस होते. नागपूरमध्ये कमाल तापमान मात्र ३३.६ अंश सेल्सिअस होते. हे तापमान सरासरीपेक्षा २.७ अंशांनी अधिक आहे. जळगावमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ अंशांनी कमी नोंदवण्यात आला. जळगावचे किमान तापमान बुधवारी १२.६ अंश सेल्सिअस होते.

राज्यात बुधवारी सोलापूरमध्ये सरासरीपेक्षा ४.१ अंशांनी किमान तापमान खाली उतरले होते. सोलापुरात १४.२ अंश सेल्सिअस, तर परभणी येथेही किमान तापमान सरासरीपेक्षा ४ अंशांनी कमी (१३अंश) होते. वर्धा, यवतमाळ येथेही किमान तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी आहे. मात्र त्याच वेळी यवतमाळचे कमाल तापमान सरासरीहून तब्बल ५.१ अंशांनी अधिक आहे. बुलडाणा येथे कमाल तापमान सरासरीहून ४.९ अंशांनी अधिक आणि किमान तापमान २.१ अंशांनी कमी आहे. राज्यात थोड्याफार फरकाने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र येथे सगळीकडे कमाल आणि किमान तापमानात अशाच पद्धतीने फरक जाणवत आहे. या तुलनेत कोकणात कमाल तापमान १ ते २.६ अंशांनी कमी झाल्याचे निरीक्षण प्रादेशिक हवामान विभागातर्फे नोंदवण्यात आले आहे.

नोव्हेंबर अखेरपर्यंत थंडीची प्रतीक्षाच

पहाटेच्या वेळी कमी झालेले तापमान हे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी होत नसून पूर्वेकडून आणि ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी होत आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाचे मुख्य प्रवक्ते एस. बिश्वंभर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्याचा पहाटेच्या वेळी हवेत जाणवणारा गारवा हा थंडीची चाहूल देणारा नाही. त्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असेही ते म्हणाले. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान हे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी होत आहे. कमाल तापमानात घट हीसुद्धा थंडीच्या आगमनाची लक्षणे नाहीत, असेही ते म्हणाले. आज, गुरुवारी कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअसदरम्यान असेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील बुधवारचे तापमान

शहर किमान कमाल

पुणे १३.७ ३२.६

नाशिक १२.३ ३२.७

जळगाव १२.६ ३५.६

सांगली १३.३ ३२.२

औरंगाबाद १२.५ ३३.४

परभणी १३.० ३३.९

नागपूर १२.० ३३.६

यवतमाळ १४.० ३५.०

(माहिती स्रोत - पुणे प्रादेशिक हवामान विभाग)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज