अ‍ॅपशहर

सीएसएमटीचा जिना खुला; लाखो प्रवाशांचा त्रास वाचणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हार्बर मार्गावरील लोकल सुटणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील दुरुस्तीसाठी बंद असलेल्या पुलाचा जिना अखेर सोमवारी रात्री सुरू करण्यात आला. यामुळे प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी 'डेडएंड'ला वळसा घालण्याचा लाखो प्रवाशांचा त्रास वाचणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पुलाच्या संरक्षक कठड्यांसाठी (साइड बॅरिकेडिंग) हेरिटेज पुलावरील अतिरिक्त प्लॅस्टरचा भाग काही प्रमाणात हटवण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 24 Apr 2019, 5:31 am
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम csmt


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हार्बर मार्गावरील लोकल सुटणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील दुरुस्तीसाठी बंद असलेल्या पुलाचा जिना अखेर सोमवारी रात्री सुरू करण्यात आला. यामुळे प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी 'डेडएंड'ला वळसा घालण्याचा लाखो प्रवाशांचा त्रास वाचणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पुलाच्या संरक्षक कठड्यांसाठी (साइड बॅरिकेडिंग) हेरिटेज पुलावरील अतिरिक्त प्लॅस्टरचा भाग काही प्रमाणात हटवण्यात आला आहे.

सीएसएमटी स्थानकातील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेनंतर दुर्घटनाग्रस्त पुलाला जोडणारा रेल्वेचा पादचारी पूल प्रारंभी खुला होता. मात्र नंतर प्लॅटफॉर्म क्र. एकच्या पायऱ्या बंद करण्यात आल्या. यामुळे प्लॅटफॉर्म क्र. १ वरून प्लॅटफॉर्म क्र. २-३ आणि ४ वर जाण्यासाठी प्रवाशांना 'डेडएंड'ला वळसा घालून जावे लागत होते. हा फेरा टाळण्यासाठी अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत होते. या पुलाचा वापर केवळ प्लॅटफॉर्म क्र. ७-८ वरून प्लॅटफॉर्म क्र. १८वर जाण्यासाठी होत होता. मात्र पायऱ्यांचे काम पूर्ण झाल्याने अखेरीस पुलाचा जिना खुला झाल्याने सीएसएमटीच्या 'डेडएन्ड' परिसरातील गर्दी टळणार असून प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

'सीएसएमटी स्थानकातील दादर दिशेकडील पुलाचा प्लॅटफॉर्म क्र. एकवर उतरणारा जिना सोमवारी रात्री प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. नियोजनानुसार २४ एप्रिलपर्यंत पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पायऱ्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने हा जिना खुला करण्यात आला', अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

पायऱ्या उभारण्यासाठी ९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मनीष मार्केटसह मशिद परिसरातून येणाऱ्या बहुतेक प्रवाशांना मध्य रेल्वेमार्गावरील धीम्या तसेच जलद लोकल पकडण्यासाठी आता प्लॅटफॉर्म क्र. १ वरील जिन्याचा वापर करता येणार आहे.

सीएसएमटी येथील इमारतीला पुरातन वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी दुरुस्तीचे आणि रंगरंगोटीचे काम सुरू आहे. यामुळे सीएसएमटी येथील 'डेडएंड' परिसरात काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

अतिरिक्त प्लॅस्टर काढले

पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती केल्यानंतर संरक्षक कठड्यांसाठी हेरिटेज बांधकामाच्या खांबावरील अतिरिक्त प्लॅस्टर काढून टाकण्यात आले आहे. या कामामुळे मुख्य हेरिटेज खांबाला कोणत्याही प्रकारे धक्का लागलेला नसून तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज