अ‍ॅपशहर

एका क्लिकवर गोपनीय माहिती उघड; महाराष्ट्रासह तीन राज्यांतील लाखो नागरिकांचा डेटा लीक

खात्री करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक तयार करून ही संकेतस्थळ चालविणाऱ्याशी संपर्क केला. त्यानंतर सदस्यत्व घेतल्यानंतर या संकेतस्थळावर जाऊन पाहिल्यास कुणाचेही नाव टाकल्यास त्याची सर्व वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती सर्व काही पाहता येत होते.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 28 Nov 2022, 7:32 am
मुंबई : महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि गुजरात राज्यांतील नागरिकांची गोपनीय आणि वैयक्तिक माहिती एका क्लिकवर संकेतस्थळावर उपलब्ध करून देणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तिन्ही राज्यांतील लाखो नागरिकांचा डेटा लीक करून तो बेकायदा विकला जात असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. या संकेतस्थळावर व्यक्तीचे नाव, गाव, कुटुंबीयांची माहिती, मोबाइल क्रमांक, आधारकार्ड, पॅनकार्ड सर्व काही उपलब्ध आहे. या दोघांनी हा सर्व डाटा कुठून मिळवला याचा तपास पोलिस करीत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cyber crime2
एका क्लिकवर गोपनीय माहिती उघड; महाराष्ट्रासह तीन राज्यांतील लाखो नागरिकांचा डेटा लीक


केंद्र सरकारने आधार कार्ड तसेच पॅनकार्डची प्रणाली संरक्षित म्हणून जाहीर केली आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड बरोबरच पासपोर्ट तसेच इतर शासकीय ओळखपत्राची प्रणाली शासनाने ऑनलाइन उपलब्ध करून दिली. नागरिकांची हि माहिती सुरक्षित आणि गोपनीय राहावी यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. शासकीय परवानगीशिवाय कुणालाही या प्रणालीमध्ये हस्तक्षेप करता येत नाही. तरीही दोन संकेतस्थळावर महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि गुजरातमधील नागरिकांची सर्व माहिती कुणालाही एका क्लिकवर पाहता येत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ६ चे प्रभारी पोलिस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांना मिळाली. खात्री करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक तयार करून ही संकेतस्थळ चालविणाऱ्याशी संपर्क केला. त्यानंतर सदस्यत्व घेतल्यानंतर या संकेतस्थळावर जाऊन पाहिल्यास कुणाचेही नाव टाकल्यास त्याची सर्व वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती सर्व काही पाहता येत होते.

कोणत्याही परवानगीशिवाय ही माहिती लीक होत असल्याची बाब गंभीर असल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने जवळपास दोन महिने यावर बारकाईने नजर ठेवली. यामधील सर्व बारकाव्यांचा अभ्यास करून ती चालविणाऱ्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यात आला. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि इतर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली.

दोन हजारांत सदस्यत्व

कुणालाही नागरिकांची माहिती हवी असल्यास संकेतस्थळ चालविणाऱ्या महिना दोन हजार रुपये घेऊन सदस्यत्व देतात. सहा महिने आणि वर्षभराचे सदस्यत्व घेता येते. पैसे भरल्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड दिला जातो आणि सदस्यत्व असेपर्यंत त्याचा वापर करून या संकेतस्थळावरून कुणाचीही कोणतीही माहिती मिळवता येते.

महत्वाचे लेख