म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांनाच कायम ठेवून, प्रदेश काँग्रेसप्रमाणेच मुंबई काँग्रेससाठीही तीन कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने दिली.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला; परंतु त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनविले होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा फेटाळून त्यांनाच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी ठेवण्याचा पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांचा विचार आहे. याबाबत मुंबई काँग्रेसमधील विविध गटातटाच्या नेत्यांनीही देवरा यांनाच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम ठेवावे, अशी आग्रही मागणी केली आहे. त्यामुळे त्यांना न बदलता मुंबई काँग्रेसचे तीन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याचे ठरत आहे.
काँग्रेसने प्रदेश काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि पाच कार्यकारी अध्यक्ष नेमण्याचा प्रयोग केला आहे. याच धर्तीवर मुंबई शहर, पूर्व मुंबई उपनगर आणि पश्चिम उपनगर असे तीन कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात येणार आहेत. ते नेमताना विविध भाषकांना प्रतिनिधित्व कसे मिळेल हेही बघितले जाईल, असे काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.