अ‍ॅपशहर

जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा RBI स्वीकारणार

देशभरातील जिल्हा बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात 'काळ्याचं पांढरं' होण्याची शक्यता वर्तवत, त्यांच्याकडून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा न स्वीकारण्याची भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारनं आज या बँकांना मोठा दिलासा दिला आहे.

Maharashtra Times 21 Jun 2017, 2:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम district central cooperative banks allowed to deposit demonetised notes with rbi
जिल्हा बँकांकडील जुन्या नोटा RBI स्वीकारणार


देशभरातील जिल्हा सहकारी बँकांना आज केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. पुढच्या ३० दिवसांत जिल्हा सहकारी बँकांना आपल्याकडील जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहेत. तसंच, अन्य बँका आणि पोस्टातील जुन्या नोटाही रिझर्व्ह बँक स्वीकारणार आहे.

बहुतांशी जिल्हा बँकांवर स्थानिक राजकारण्यांचं वर्चस्व आहे. या बँकांना पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी दिल्यास त्या 'काळ्याचं पांढरं' करणारी केंद्रंच बनतील, अशी दाट शक्यता केंद्र सरकारला वाटत होती. म्हणूनच, नोटाबंदीच्या घोषणेनंतर सहा दिवसांनी केंद्रानं एक परिपत्रक काढलं होतं. जिल्हा सहकारी बँकांनी जुन्या नोटा घेऊ नयेत, चलनबदल करून देऊ नये, त्यांच्याकडील चलनबाह्य नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारणार नाही, अशी भूमिका जाहीर करून केंद्राने सगळ्यांनाच धक्का दिला होता. स्वाभाविकच, जिल्हा बँकांना नोटाबंदी चांगलीच महागात पडली होती. परंतु, आता केंद्रानं त्यांना आधार दिला आहे.

८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर, पुढच्या पाच दिवसांत पाचशे आणि हजाराच्या ज्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्यात, त्या जिल्हा बँकांनी पुढच्या ३० दिवसांत रिझर्व्ह बँकेकडे जमा कराव्यात, असे निर्देश अर्थखात्यानं दिले आहेत. अन्य बँका आणि टपाल कार्यालयानांदेखील ३० डिसेंबर २०१६ पूर्वी जमा झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून बदलून घेता येतील, असं त्यांनी स्पष्ट केलंय. अर्थात, या नोटा आधी का जमा केल्या नाहीत, याचा खुलासा त्यांना करावा लागणार आहे.

राज्यातील जिल्हा बँकांकडे २,७७१ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा आहेत. त्या आता रिझर्व्ह बँकेकडून बदलून मिळणार आहे. त्यामुळे या बँका मोठ्या आर्थिक संकटातून सुटू शकणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज