अ‍ॅपशहर

मुंबईतील गृहस्वप्न आवाक्यात! कुर्ला-ठाणे पट्ट्यात प्रकल्प

वन-बीएचके घरबांधणीबाबत बिल्डरांनी घेतलेला आखडता हात...टू-बीएचके किंवा थ्री-बीएचके घरांच्या न परवडणाऱ्या किमती...यामुळे मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे भंगलेलं स्वप्न...या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या घडामोडी बांधकाम क्षेत्रात घडू लागल्या आहेत.

Maharashtra Times 29 Aug 2016, 4:22 am
कुर्ला-ठाणे पट्ट्यात वन-बीएचके घरांचे प्रकल्प
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dream home in mumbai
मुंबईतील गृहस्वप्न आवाक्यात! कुर्ला-ठाणे पट्ट्यात प्रकल्प


जयंत होवाळ । मुंबई

वन-बीएचके घरबांधणीबाबत बिल्डरांनी घेतलेला आखडता हात...टू-बीएचके किंवा थ्री-बीएचके घरांच्या न परवडणाऱ्या किमती...यामुळे मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे भंगलेलं स्वप्न...या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या घडामोडी बांधकाम क्षेत्रात घडू लागल्या आहेत. कुर्ला ते ठाणे पट्ट्यात वन-बीएचकेची घरे बांधण्याच्या दृष्टीने विविध बिल्डरांचे गृहनिर्माण प्रकल्प येऊ घातले असून, अशा प्रकल्पांचे प्रमाण ३५ टक्के आहे.

मागील काही वर्षांत नफा कमावण्याच्या दृष्टीने बिल्डरांनी टू किंवा थ्री-बीएचके घरे बांधण्यास प्राधान्य दिले होते. दीड कोटींहून अधिक किंमत असलेली ही घरे मध्यमवर्गीयांना परवडणे अशक्य होते. म्हाडा किंवा अन्य सरकारी यंत्रणांकडून होत असलेल्या घरबांधणीला मर्यादा असल्याने वाजवी दरातील असंख्य घरे घेणे अशक्य झाले होते. मात्र अलीकडच्या काळात बांधण्यात आलेली टू किंवा थ्री-बीएचके घरांना म्हणावी तशी मागणी नसल्याने आजही ही घरे विक्रीअभावी पडून आहेत. त्याचवेळी वन-बीएचके घरांची मागणी प्रचंड वाढली आहे. साहजिकच २०१५च्या तुलनेत २०१६ आणि २०१७मध्ये घरखरेदी मोठ्या प्रमाणावर होईल, याकडे रिअल इस्टेट क्षेत्राचे दर तीन महिन्यांनी सर्वेक्षण करणाऱ्या आणि त्या माध्यमातून या क्षेत्रांचा ट्रेंड ठरवणाऱ्या 'कुशमॅन अँड वेकफील्ड' या संस्थेने लक्ष वेधले आहे. येत्या दोन वर्षांत हे प्रकल्प पूर्णत्वास जातील, असा अंदाज आहे. त्यापुढील तीन वर्षांत अशा प्रकारच्या घर बांधणीचे लक्ष्य ५५ टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

पूर्व उपनगरात अधिक वाव

पश्चिम उपनगराच्या तुलनेत पूर्व उपनगरात वन-बीएचके घरबांधणीला जास्त वाव आहे. कुर्ला ते ठाणे पट्ट्यात अशाप्रकारचे घरबांधणीचे अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. या घरबांधणीच्या प्रमाण सध्या ३५ टक्के आहे. पश्चिम उपनगरात मात्र अजूनही टू किंवा थ्री-बीएचके घरांना मोठी मागणी आहे.

मुंबईकरांना दिलासा

वाढत्या कुटुंबाची गरज भागवण्यासाठी मध्यमवर्गीयांना वन-बीएचकेपेक्षा मोठ्या घरांची गरज होती. ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची घरे होती त्यांनी ती विकली. बँकेचे कर्ज काढले आणि जमा झालेल्या पैशातून टू-बीएचकेचे लक्ष्य गाठले. मोठ्या घराची निकड भागवण्यासाठी अनेकांनी ठाण्याबाहेरचा पर्याय शोधला. वन-बीएचके घरांचे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास मुंबईकरांना दिलासा मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज