अ‍ॅपशहर

अतिरिक्त शिक्षकांच्या सेवा सुरक्षित; शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

अकरावीच्या तुकडीमध्ये ४ ते ५ टक्के वाढीव विद्यार्थी घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही कनिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार नसल्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेला दिले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2019, 3:46 pm
मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teacher


अकरावीच्या तुकडीमध्ये ४ ते ५ टक्के वाढीव विद्यार्थी घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही कनिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार नसल्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेला दिले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तुकडीत वाढीव विद्यार्थी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक वर्गात विद्यार्थी संख्या वाढणार. त्याचा परिणाम शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर होणार असल्याचे संघटनेने म्हटले. त्याशिवाय, प्रत्येक तुकडीत अतिरिक्त विद्यार्थी घेतल्यामुळे काही कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भिती संघटनेने व्यक्त केली होती. यावर शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात येणार नसून त्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले.

अनुदानित तुकड्या विद्यार्थी संख्येअभावी बंद करू नये, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मूळ विद्यार्थी संख्या दर्शवण्यात यावी, आदी मागण्याही संघटनेने केल्या. या मागण्यांवर अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन शेलार यांनी शिष्टमंडळाला दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज