अ‍ॅपशहर

सामान्य प्रवाशांवर दुरांतोच्या तिकिटांचा तिप्पट भार; गाडीच्या डब्यांमध्येही बदल करण्याचा निर्णय

सामान्य प्रवाशांवर दुरांतोच्या तिकिटांचा तिप्पट भार पडणार आहे. दुरांतो एक्स्प्रेसचे शयनयान डबे कमी करून वातानुकूलित डबे वाढवण्यात आले आहेत.

Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स 17 Feb 2023, 8:06 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूरदरम्यान बारमाही प्रवासी आणि संपूर्ण आरक्षण लाभलेल्या रेल्वेगाडी म्हणजे दुरांतो एक्स्प्रेस. या गाडीच्या डब्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याने सामान्य प्रवाशांवर तिकीटांचा तिप्पट भार पडणार आहे. नव्या रचनेत शयनयान डब्यांची संख्या घटवण्यात आली असून वातानुकूलित (एसी) डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. जूनपासून हे बदल लागू करण्यात येणार असल्याने नागपूर-दुरांतोमधून सर्वसामान्यांचा प्रवास महागणार आहे. नव्या बदलातील दुरांतोचे आरक्षण आज, शुक्रवारपासून खुले होणार असून १६ जूनपासून नव्या बदलाची अंमलबजावणी होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम duranto
सामान्य प्रवाशांवर दुरांतोच्या तिकिटांचा तिप्पट भार; गाडीच्या डब्यांमध्येही बदल करण्याचा निर्णय


नागपूर-दुरांतो मुंबईसह नागपूर मधील प्रवाशांच्या प्रथम पसंतीची रेल्वेगाडी आहे. शयनयान, तृतीय एसी, द्वितीय एसी आणि प्रथम एसी या सर्व वर्गालाही प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभतो. गाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहेत. एक प्रथम एसी, तीन द्वितीय एसी, १५ तृतीय एसी आणि दोन शयनयान या डब्यांसह १६ जूनपासून ही गाडी धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. सध्या एक्स्प्रेसमध्ये आठ शयनयान डबे असून तृतीय एसीचे नऊ डबे आहे. नव्या बदलात शयनयान श्रेणीचे सहा डबे कमी केले असून तृतीय एसीचे डबे वाढवण्यात आले आहेत. शयनयान श्रेणीचे तिकीट ६२५ रुपये असून तृतीय एसीचे तिकीट दर १ हजार ७१० रुपये आहे. सहा डबे कमी केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना तृतीय एसीने श्रेणीने प्रवास करावा लागणार आहे.

आज, शुक्रवारपासून नव्या संरचनेतील दुरांतो एक्स्प्रेसचे आरक्षण खुले होणार आहे. शयनयान श्रेणीच्या तिकीटांची प्रतीक्षायादी सातत्याने वाढत असते. यामुळे या श्रेणीचे डबे वाढवण्याची मागणी सातत्याने प्रवाशांकडून करण्यात येते. मात्र, त्याकडे थेट दुर्लक्ष केले जात आहे.

(१२२८९) मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस

प्रवास श्रेणी - तिकीट दर बोगी रचना

शयनयान - ६२५ (पूर्वी ८/ आता २)

तृतीय वातानुकूलित - १,७१० (पूर्वी ९/ आता १५)

द्वितीय वातानुकूलित - २,४०० (पूर्वी ३/ आता ३)

प्रथम वातानुकूलित - २,९५० (पूर्वी १/ आता १)
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज