अ‍ॅपशहर

dust storm : पाकिस्तानच्या वादळाचा परिणाम; मुंबई, पुणे, कोकणात धुळीचे साम्राज्य

पाकिस्तानात धुळीच्या वादळाचा परिणाम मुंबई, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळाला. या भागात दिवसभर धुळीचे साम्राज्य होते. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक रविवारी अतिवाईट नोंदवला गेला.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 24 Jan 2022, 9:55 am

हायलाइट्स:

  • पाकिस्तानमध्ये धुळीचे वादळ
  • मुंबई, कोकण आणि पुण्यात धुळीचे साम्राज्य
  • मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिवाईट
  • धुळीच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी दृष्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dust storm : पाकिस्तानच्या वादळाचा परिणाम; मुंबई, पुणे, कोकणात धुळीचे साम्राज्य
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/ पुणे: पाकिस्तानकडून आलेल्या धुळीच्या वादळामुळे मुंबई, पुण्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रविवारी दिवसभर वातावरण धुलीमय झाल्याचा अनुभव आला. धुळीच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी दृष्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी झाल्याचे दृश्य होते; तर दिवसाच्या कमाल तापमानातही घट नोंदली गेली.
महाराष्ट्रासाठी धुळीचे वादळ नवे नसले तरी हवामानाची ही घटना दुर्मिळ मानली जाते. शनिवारी पाकिस्तानातील कराचीला धडकलेले धुळीचे वादळ रविवारी गुजरात आणि अरबी समुद्रमार्गे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. आखाती देशांकडूनही धुळीचे लोट भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे सरकत असल्याचे उपग्रहीय चित्रांत दिसले.


सव्वा लाख मुंबईकरांनी केल्या घरी चाचण्या

रविवारी सकाळपासूनच पुणे आणि मुंबईत धुरकट हवेसह सूर्यप्रकाश कमी असल्याचे दृश्य होते. सकाळपासून वाहणाऱ्या वाऱ्यांनी मुंबईतले रस्ते, वाहने, झाडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात धूळ जमा झाली होती. या परिस्थितीमुळे मुंबईच्या प्रदूषणाचा निर्देशांक रविवारी वाढला. ही परिस्थिती संध्याकाळच्या सुमारास हळुहळू निवळली. आज, सोमवारी मुंबईत धुळीचा प्रभाव कमी होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली. गुजरातवर निर्माण झालेले धुळीचे वादळ आणि मुंबईमध्ये वाहणारे पश्चिमी वारे यांच्या संयुक्त प्रभावामुळे मुंबईमध्ये धुळीचे वारे वाहत असल्याची माहिती वरिष्ठ हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनीही हजेरी लावली. हवेत धुळीचे प्रमाण जास्त असल्याने अर्धा ते एक किलोमीटरच्या पुढील दृश्य अस्पष्ट दिसत होते. याचा थेट परिणाम वाहतुकीच्या वेगावरही झाला. पालघर ते रत्नागिरी आणि नंदुरबार ते सातारा या भागांत धुळीच्या वादळाचा जास्त प्रभाव दिसून आला.

दृष्टी गेलेल्यांचे भरपाईकडे डोळे;शस्त्रक्रिया झालेल्या सात जणांचे कुटुंबीय अडचणीत

कमाल तापमानाचा पारा उतरला

मुंबईमध्ये कुलाबा येथे २४, तर सांताक्रूझ येथे २३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाचा पारा होता. अवघ्या २४ तासांमध्ये कुलाबा येथे ६ अंशांनी तापमान उतरले, तर सांताक्रूझ येथेही सुमारे ६ अंशांनी कमाल तापमानाचा पारा उतरला होता. हे तापमान सरासरीपेक्षा कुलाबा येथे ५.८ अंशांनी आणि सांताक्रूझ येथे ६.९ अंशांनी कमी होते. सांताक्रूझ येथे जानेवारीतील सर्वांत कमी कमाल तापमानाचा रविवारी नवा विक्रम नोंदवला गेला. जानेवारीतील गेल्या १० वर्षांमधील हे सर्वांत कमी कमाल तापमान होते. गेल्या १० वर्षांमध्ये सन २०२०मध्ये २५.३ अंश सेल्सिअस हे सर्वांत कमी कमाल तापमान होते. त्यानंतर सन २०२२मध्ये नवा विक्रम नोंदवला गेला. मुंबईमध्ये दिवसभरात सूर्यदर्शनही न झाल्याने कमाल तापमानाचा पारा चढला नव्हता. सांताक्रूझ येथे किमान तापमान २१, तर कुलाबा येथे २१.६ अंश सेल्सिअस होते. ढगाळ वातावरणामुळे रविवारी किमान तापमानाचा पारा शनिवारच्या तुलनेत चढला. मात्र त्यानंतर दिवसभरात फारसा तापमान बदल झाला नाही.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरला

धुळीच्या वादळामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक रविवारी अतिवाईट नोंदवला गेला. मुंबईचा गुणवत्ता निर्देशांक ३३३ होता. मुंबईत माझगाव, वरळी, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, भांडुप येथे हवेची गुणवत्ता अतिवाईट नोंदवली गेली. मालाड येथे हवेचा दर्जा धोकादायक नोंदला गेला. मालाड येथे पीएम २.५चा गुणवत्ता निर्देशांक ४३६ होता. कुलाबा येथे दिवसभर हवेची गुणवत्ता वाईट, तर बोरिवली येथे मध्यम होती.

महत्वाचे लेख