अ‍ॅपशहर

तंत्रज्ञानाने वाढवा कार्यक्षमता: फडणवीस

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच आपल्या कामातील दर्जा व कार्यक्षमता वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग करावा, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Maharashtra Times 31 Jul 2017, 7:28 am
मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिसांना आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम enhanced technology
तंत्रज्ञानाने वाढवा कार्यक्षमता: फडणवीस


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच आपल्या कामातील दर्जा व कार्यक्षमता वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग करावा, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्याच्या पोलिस मुख्यालयात शनिवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलिस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे आयुक्त दत्ता पडसलगीकर यावेळी उपस्थित होते. पोलिस दलाच्या ‘दक्षता’ मासिकाच्या गणेशोत्सव व स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे तसेच फेसबुक पेजचे अनावरणही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस कल्याण मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, पोलिस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात यावा. राज्यातील अनेक अधिकाऱ्यांकडे नवनवीन कल्पना आहेत. त्यांचा वापर कामामध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. राज्यात गुन्हे व गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी अन्वेषण यंत्रणा व प्रणाली हा प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती जमा झाली आहे. या माहितीचे विश्लेषण करून त्याचा वापर दैनंदिन कामामध्ये वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. गुन्ह्याची तक्रार (एफआयआर) डिजिटल स्वरूपात घ्यावी. मोबाइलवरून नागरिकांना तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यासाठी यंत्रणा उभी करावी. हा डाटा साठविण्यासाठी क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करावा. राज्यात अद्ययावत फोरेन्सिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. या प्रयोगशाळांचा उपयोग करून गुन्ह्यांची उकल व सिद्धतेसाठी जास्तीत जास्त फोरेन्सिक पुरावे वापरण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

घरे, पदोन्नतीच्या प्रश्नांची दखल

गेल्या तीन वर्षांत पोलिस दलाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था योग्य रितीने हाताळल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने अधिकारांचे विकेंद्रीकरण करून पोलिस अधिकाऱ्यांना जास्तीचे अधिकार दिले आहेत. त्याचा वापर जनतेच्या हितासाठी करावा. अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. बेसिक पोलिसिंग व गुप्त माहितीचा स्त्रोत वाढविण्यासाठीही प्रयत्न गरजेचे आहेत. पोलिसांची घरे, पदोन्नतीचे प्रश्न तातडीने सोडविण्यात येत आहेत. पोलिसांच्या इतर विविध अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पोलिस महासंचालक माथूर व मुंबईचे पोलिस आयुक्त पडसलगीकर यांनी यावेळी सादरीकरण केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज