अ‍ॅपशहर

हेलिकॉप्टर बदलाचा कार्यक्रमच 'कोसळला'; ना रशियन कामोव्ह आले, ना स्वदेशी एलयूएच

मागील चार वर्षांत ‘एचएएल’ही अशी फक्त सहा ‘एलयूएच’ भूदलाला पुरवू शकली आहे. ‘एचएएल’चा हा वेग पाहता भूदलाच्या ताफ्यात असलेली ३६ चिता हेलिकॉप्टर बदलण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत.

Authored byचिन्मय काळे | महाराष्ट्र टाइम्स 17 Mar 2023, 11:33 am
मुंबई: भूदलाच्या ताफ्यात असलेली व उंच प्रदेशातील उड्डाणाची सत्तरीच्या दशकातील चेतक व चिता हेलिकॉप्टर बदलण्याचा संपूर्ण कार्यक्रमच संकटात आहे. पर्यायी हेलिकॉप्टरसाठी आजवर तीन वेळा प्रयत्न झाले. मात्र, अद्याप ते फळास आलेले नाहीत. ही जुनी हेलिकॉप्टर कोसळून होणारे अपघात लष्करी अधिकाऱ्यांच्या जिवावर बेतत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम helicopter
हेलिकॉप्टर बदलाचा कार्यक्रमच 'कोसळला'; ना रशियन कामोव्ह आले, ना स्वदेशी एलयूएच


भूदलाचे चिता हेलिकॉप्टर गुरुवारी अरुणाचल प्रदेशात कोसळले. हा या हेलिकॉप्टरचा मागील तीन वर्षांतील चौथा अपघात आहे. भूदलात ही सर्व हेलिकॉप्टर १९७२ दरम्यान दाखल झाली होती. ती आता फार जुनी होणे, हे अपघाताचे प्रमुख कारण ठरत आहे. अपघात टाळण्यासाठी या हेलिकॉप्टर बदलण्याचा कार्यक्रम पुढे नेणे अत्यावश्यक असल्याचे निवृत्त हवाईदल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लष्कराच्या ताफ्‍यातील चेतक आणि चिता ही दोन हे‌लिकॉप्‍टर खूप जुनी झाली आहेत. हलक्या श्रेणीतील ही हेलिकॉप्टर उंच प्रदेशासाठी उपयुक्त ठरतात. पण ती जुनी झाल्याने अशी २०० हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा निर्णय २०१२ दरम्यान झाला होता. त्या करारात घोटाळ्याचा संशय निर्माण झाल्याने हा संपूर्ण करार २०१४ मध्ये मोदी सरकारने रद्द केला.

लष्कराची तातडीची गरज असल्याने पुन्हा निविदा काढण्याऐवजी थेट ‘सरकार ते सरकार’ अशा पद्धतीने २०० हेलिकॉप्टर्स रशियाकडून खरेदी करण्याचा निर्णय तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला. त्याद्वारे २०१६ मध्ये रशियाशी करार करत २०० हे‌लिकॉप्टर्सपैकी १६० हेलिकॉप्‍टर्स व त्याच्याशी निगडित सुटे भाग ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतातच तयार करण्याचे ठरवले. परंतु त्यामध्येही अडथळा निर्माण झाला. हे सुटे भाग नागपूरजवळील मिहान-सेझ प्रकल्पात अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या कंपनींतर्गत तयार केले जाणार होते. तशी सर्व रचना २०१६ मध्ये झाली होती. परंतु ती कंपनी ठप्प झाल्याने हा प्रकल्प तेथे आकारासच येऊ शकला. परंतु भूदलाची हलक्या हेलिकॉप्टरची गरज तातडीने पूर्ण होणे आवश्यक होतेच. यासाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) ‘लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर’ अर्थात ‘एलयूएच’चा पर्याय समोर आला.

उंच प्रदेशातील प्रमुख हेलिकॉप्टर
हेलिकॉप्टर क्षमता (फूटांत)


एमआय १७ १४ ते १५ हजार

एएलएल ध्रृव १८ हजार

चीता, चेतक १९ ते २० हजार

कामोव्ह २२६ टी २० ते २१ हजार

एलयूएच २१ हजार

महत्वाचे लेख