अ‍ॅपशहर

माजी सैनिकाचा उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न; न्यायमूर्तींसमोरच मनगटाची नस कापून घेण्याचा प्रयत्न

पुण्यातील मालमत्तेबाबत आई व कुटुंबीयांसोबत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात अपयश आल्यानंतर याचिकाकर्ते माजी सैनिक तुषार शिंदे यांनी शुक्रवारी नैराश्यातून भर न्यायालयातच न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमक्ष आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 18 Jun 2022, 6:56 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पुण्यातील मालमत्तेबाबत आई व कुटुंबीयांसोबत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात अपयश आल्यानंतर याचिकाकर्ते माजी सैनिक तुषार शिंदे यांनी शुक्रवारी नैराश्यातून भर न्यायालयातच न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमक्ष आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. न्यायमूर्तींनी निकाल सुनावताच शिंदे यांनी पेपरकटरच्या सहाय्याने आपली मनगटाची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकाराने एकच गोंधळ उडाल्यानंतर उपस्थित वकिलांनी शिंदे यांना तात्काळ रोखले आणि नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bombay-high-court


भर न्यायालयातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने उच्च न्यायालयाच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयात प्रवेश करण्यासाठी अनेक प्रवेशद्वार आहेत. त्यातील एक-दोन प्रवेशद्वारांवरील स्कॅनर काही दिवसांपासून बंद असल्याने पोलिसांकडून हँड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी होत आहे. 'उच्च न्यायालयात दररोज पक्षकार व वकिलांसह हजारोंच्या संख्येत लोक येत असतात. त्यामुळे प्रत्येकाची योग्य तपासणी होऊनच प्रवेश दिला जाणे आवश्यक आहे. सध्याच्या सुरक्षाव्यवस्थेत काही तरी त्रुटी असावी. म्हणूनच पक्षकाराची पेपर कटर घेऊन थेट न्यायालयात पोहोचण्यापर्यंत मजल गेली असावी', अशी भीती एका वकिलाने यासंदर्भात व्यक्त केली.

तुषार शिंदे यांच्या आईने पालकांची देखभाल व कल्याण आणि ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत पुणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज केला होता. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी २१ मे २०१८ रोजी आईच्या बाजूने निर्णय दिला होता. त्याला तुषार यांनी फौजदारी रिट याचिकेद्वारे आव्हान दिले होते. न्या. नाईक यांनी ही याचिका शुक्रवारी अंतिम सुनावणीसाठी ठेवली होती. सकाळी ११.३०च्या सुमारास सुनावणी पूर्ण केल्यानंतर न्यायमूर्तींनी आपला निर्णय दिला. तो आपल्याविरोधात गेल्याचे लक्षात येताच तुषार यांनी आपल्या जीन्सच्या पँटमधून कटर काढत गोंधळ सुरू केला आणि मनगटाची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला. ते पाहताच त्यांच्याजवळ उभे असलेले अॅड. महेश राऊ यांनी त्यांना रोखले. त्याचबरोबर न्यायालयात उपस्थित असलेल्या सरकारी वकिलांनीही त्यांना धरून ठेवले. काही क्षणांत घडलेल्या या प्रकाराने न्यायालयात गोंधळाचे वातावरण झाले होते. त्यानंतर न्यायालयाबाहेरचे पोलिस कॉन्स्टेबल व अन्य पोलिसांनी तुषार यांना ताब्यात घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली. तुषार यांच्याविरोधात गुन्हा दाखल न करता त्यांना सोडून द्यावे, अशी सूचना न्यायमूर्तींनी पोलिसांना केली. त्यानुसार तुषार यांना आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून घेत त्यांच्याकडे त्यांना सोपवले. दरम्यान, या घटनेनंतरही न्या. नाईक यांनी आपल्या न्यायालयातील नियमित कामकाज तसेच सुरू ठेवत संध्याकाळी उशिरापर्यंत प्रकरणांची सुनावणी घेतली.

महत्वाचे लेख