अ‍ॅपशहर

१०० वर्षांची व्यक्तिचित्र परंपरा उलगडणार

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट सुरू झाले आणि या मातीतील चित्रकारांना व्यक्त होण्यासाठी अधिक योग्य दिशा मिळाली. त्यानंतर ‘जेजे’मधून घडणाऱ्या चित्रकारांनाही व्यक्तिचित्रे काढण्यासाठी निमंत्रणे मिळू लागली. बॉम्बे स्कूल म्हणून या शैलीची ओळख प्रस्थापित होत गेली. याच १०० वर्षांहून जुन्या असलेल्या महाराष्ट्राच्या व्यक्तिचित्रण कलेचे सादरीकरण द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या द पोर्ट्रेट शोमधून करण्यात येणार आहे. कलाकार, चित्रकार नाना पाटेकर या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.

Maharashtra Times 13 Jul 2016, 2:00 am
बॉम्बे आर्ट सोसायटीचे व्यक्तिचित्र प्रदर्शन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम exhibition of portraits of 100 yeras
१०० वर्षांची व्यक्तिचित्र परंपरा उलगडणार


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

व्यक्तींच्या आठवणी चिरंतन जपण्यासाठी उठल्या-सुटल्या फोटो काढले जात नसत, असाही एक काळ होता. त्या काळात सर्वसाधारणपणे उच्च मध्यमवर्गीय, संस्थानिक आपली व्यक्तिचित्रे कलाकारांकडून काढून घेत. फार पूर्वी ही व्यक्तिचित्रे परदेशी चित्रकारांकडून काढून घेतली जात. मात्र जे.जे. स्कूल ऑफ आर्ट सुरू झाले आणि या मातीतील चित्रकारांना व्यक्त होण्यासाठी अधिक योग्य दिशा मिळाली. त्यानंतर ‘जेजे’मधून घडणाऱ्या चित्रकारांनाही व्यक्तिचित्रे काढण्यासाठी निमंत्रणे मिळू लागली. बॉम्बे स्कूल म्हणून या शैलीची ओळख प्रस्थापित होत गेली. याच १०० वर्षांहून जुन्या असलेल्या महाराष्ट्राच्या व्यक्तिचित्रण कलेचे सादरीकरण द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या द पोर्ट्रेट शोमधून करण्यात येणार आहे. कलाकार, चित्रकार नाना पाटेकर या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.

वांद्रे रेक्लमेशन येथील द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या आर्ट कॉम्प्लेक्समध्ये १४ जुलै ते २७ जुलैदरम्यान या चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कलाअभ्यासकांसह कलारसिकांना व्यक्तीचित्रण रेखाटण्याच्या शैलीमध्ये होत गेलेला फरक, त्यामध्ये झालेले विविध प्रयोग पाहता येतील. तैलरंग, पेस्टल, एक्रेलिक अशा विविध माध्यमांचा वापर करून ही व्यक्तिचित्रे रेखाटण्यात आली आहेत. या प्रदर्शनामध्ये कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी काढलेली व्यक्तिचित्रेही सादर करण्यात येतील. या प्रदर्शनाचे हे सर्वात मोठे आकर्षण आहे. त्याशिवाय ए. ए. भोसले, आदित्य चारी, देवदत्त पाडेकर, गोपाळ देऊसकर, जी. एस. हळदणकर, स्नेहल पागे, सुहास बहुलकर, वासुदेव कामत आदी ज्येष्ठ-श्रेष्ठ चित्रकारांसह आजच्या काळात व्यक्तिचित्रण कला जपण्यासाठी धडपडणाऱ्या चित्रकारांची चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.

सामान्यांपर्यंत या कलेचे सौंदर्य पोहोचवण्यासाठी हे व्यक्तिचित्रणाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये सुमारे ८० व्यक्तिचित्रणे प्रदर्शित केली आहेत. व्यक्तिचित्रण कसे केले जाते, त्यातील बारकावे कसे टिपायचे आदी माहिती प्रेक्षकांना मिळावी यासाठी विविध चित्रकार या प्रदर्शनादरम्यान प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. यामध्ये वासुदेव कामत नाना पाटेकर यांचे व्यक्तिचित्रण प्रेक्षकांसमोर काढणार आहेत. त्याशिवाय परदेशी कलाकारांची प्रात्यक्षिकेही ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सादर करण्यात येतील. या माध्यमातून व्यक्तिचित्रण कलेचा प्रदीर्घ प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडेल. १४ जुलै रोजी सायं. ५ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल आणि त्यानंतर २७ जुलैपर्यंत रोज दुपारी १२ ते सायं. ७ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज