अ‍ॅपशहर

'वेलिंगकर'मध्ये चित्रपटमेळा

माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये सध्या ‘चित्रभारती’ या भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मेपर्यंत रंगणाऱ्या या महोत्सवाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

Maharashtra Times 18 May 2017, 4:00 am
ज्ञानेश्वरी वेलणकर, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम film festival in wellingkar
'वेलिंगकर'मध्ये चित्रपटमेळा


माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये सध्या ‘चित्रभारती’ या भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मेपर्यंत रंगणाऱ्या या महोत्सवाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

प्रभात चित्रमंडळ आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव भरवण्यात आला आहे. अभिनेत्री इरावती हर्षे, ध्वनिमुद्रणकार अलोक डे, पटकथाकार संजय पाटील आणि अभिनेते मनोज जोशी, ‘आबा ऐकताय ना?’ या पहिल्यावहिल्या नॉन-फीचर चित्रपटासाठी सुवर्णकमळ पटकावणारे नवोदित दिग्दर्शक आदित्य जांभळे, राष्ट्रीय पुरस्कारात खास नावाजल्या गेलेल्या मुक्ती भवनचे निर्माते संजय भुतियानी आणि ‘प्रभाकर

पेंढारकर-एक परीसस्पर्श’, मराठीतल्या एका समर्थ चित्रपट दिग्दर्शक-लेखकाच्या जीवन आणि कार्यावर लघुपट बनवणाऱ्या दिग्दर्शिका यशस्विनी गोडसे, निर्माते अरुण गोडसे आदींनी या महोत्सवाला हजेरी लावली.

‘चित्रपटविषयक दर्जेदार उपक्रमातून प्रतिभावंत कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या कार्याला रसिक प्रेक्षकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. या पाठबळाच्या जोरावर 'प्रभात'ला इतका दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या भारतातल्या आघाडीच्या फिल्म सोसायटीचा मान मिळवणे शक्य झाले. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने 'चित्रभारती'चे आयोजन करताना विशेष आनंद होत आहे’, असे याप्रसंगी किरण शांताराम म्हणाले, तर वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे समूह संचालक प्रो. डॉ. उदय साळुंखे म्हणाले की, ‘एमबीएच्या विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून आणि चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेतून खूप काही शिकण्यासारखे आहे. चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे समजून घेता येतात, त्याच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय पार्श्वभूमीची जाण येते आणि या व्यापक पर्यावरणाकडे अधिक संवेदनशीलपणे बघू लागतात. म्हणून या चित्रपट महोत्सवाच्या आयोजनात सहभागी होताना मनापासून आनंद होत आहे.’

हा महोत्सव दिनांक १९ मेपर्यंत सुरू राहणार असून 'मुक्तिभवन' (हिंदी), 'के सेरा सेरा' (कोकणी), 'व्हेन द वूड्स ब्लूम' (मल्याळम), 'लेथ जोशी' (मराठी) अशा चित्रपटांमुळे रसिक जाणकारांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज