अ‍ॅपशहर

कळंबोलीतील खाद्य निगमच्या गोदामाला आग; तांदळाची २३ हजार पोती खाक

अग्निशमन दलाच्या जवळपास सहा वाहनांवरील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे मुख्य कारण समजू न शकल्याने याबाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 28 Oct 2022, 12:50 pm
पनवेल : कळंबोली येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदमाला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत तांदळाची प्रत्येकी ५० किलो वजनाची २३ हजार ६८६ पोती जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल १० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत प्रचंड आर्थिक नुकसान झाले असले, तरी जीवितहानी झालेली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kamboli fire
कळंबोलीतील खाद्य निगमच्या गोदामाला आग; तांदळाची २३ हजार पोती खाक


कळंबोली येथील लोखंड आणि पोलाद बाजार परिसरात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय खाद्य निगमची गोदामे आहेत. या गोदामांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांकडून संकलित केलेले अन्नधान्य साठवले जाते. येथून रास्त धान्य दुकानांना त्याचा पुरवठा केला जातो. बुधवारी सकाळी ७च्या सुमारास गोदामात आग लागल्याचे समजले. आगीची माहिती मिळताच, कळंबोली अग्निशमन दलाने धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु आगीची दाहकता प्रचंड असल्यामुळे खारघर, तळोजा, पनवेल, नवीन पनवेल येथील अग्निशमन दलाच्या जवळपास सहा वाहनांवरील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे मुख्य कारण समजू न शकल्याने याबाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज