अ‍ॅपशहर

मुंबईत सामंजस्याने झाला पहिला तलाक

तलाकच्या वेळी स्त्रियांच्या मनाचा आणि मताचा विचार करण्याचे गांभीर्य तथाकथित मुस्लिम पुरुष काझींनी दाखवले नाही. मात्र संविधानात्मक मार्गासह कुराणमध्ये सांगितलेल्या विधायक धर्मतत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून प्रशिक्षण घेतलेल्या महिला काझींनी मुंबईमधील एका जोडप्याला सामंजस्याने तलाक दिला.

शर्मिला कलगुटकर | Maharashtra Times 22 Jan 2018, 7:12 am
मुंबई : तलाकच्या वेळी स्त्रियांच्या मनाचा आणि मताचा विचार करण्याचे गांभीर्य तथाकथित मुस्लिम पुरुष काझींनी दाखवले नाही. मात्र संविधानात्मक मार्गासह कुराणमध्ये सांगितलेल्या विधायक धर्मतत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून प्रशिक्षण घेतलेल्या महिला काझींनी मुंबईमधील एका जोडप्याला सामंजस्याने तलाक दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम first divorce with understanding in mumbai
मुंबईत सामंजस्याने झाला पहिला तलाक


तलाक प्रक्रियेत आता महिला काझींचा सहभाग समाजाने मान्य केला आहे. त्यामुळे केवळ प्रशिक्षण घेऊन निकाह, तलाक वा अन्य सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक महिन्यांपासून खोळंबून राहिलेल्या महिला काझींना त्यांच्या कामाची दिशा योग्य असल्याचा विश्वास मिळाला आहे. तलाकमध्ये केवळ पुरुषांची बाजू ऐकून न घेता विभक्त होऊ इच्छिणाऱ्या स्त्रीच्या अधिकाराचा न्याय्य विचार व्हायला हवा, अशी या मुस्लिम महिला काझींची भूमिका आहे.

संविधान आणि कुराणला प्रमाण मानून ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ या संस्थेच्या पुढाकाराने दारुल-उलूम-ए-निस्वान येथे भारतातील ३० महिलांना काझी बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कायदेविषयक पेच, संपत्तीमध्ये स्त्रियांचा सहभाग, स्त्रीधन, भविष्यात उदरनिर्वाह करण्यासाठी देण्यात येणारी रक्कम, मुलींचे शिक्षण, सामाजिक कार्यातील सहभाग अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

बुरसटलेल्या मानसिकतेतून ही प्रकरणे काही तथाकथित पुरुष काझींकडून हातावेगळी केली जातात. जो निवाडा होतो, त्यानुसार निर्णय मान्य केला जातो. मात्र या प्रकरणात हा निर्णय घेण्यासाठी खातून शेख या महिला काझींशी संपर्क साधण्यात आला. एकमेकांना करिअरमुळे वेळ देता येत नसल्याने या जोडप्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. कालांतराने बौद्धिक-भावनिक पातळीवरही समन्वय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तलाकची प्रक्रिया संविधानाच्या मार्गाने न्यायनिवाडा करणाऱ्या महिला काझींमार्फत व्हावी, अशी या जोडप्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता शेख यांच्याकडे विचारणा केली.

चांगल्या मनाने निरोप

शेख यांनी या दोघांनाही पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा व शक्यता तपासून पाहिल्या. दोघांनाही त्यांचे यासंदर्भात मत मांडण्याची संधी मिळाली. हा तलाक सामंजस्याने झाला असल्याने यातील महिलेलाही दोन लाख रुपये पोटगी, तिचे स्त्रीधन देण्यात आले. तर तिनेही पतीचे सर्व दागिने, त्याने विश्वासाने ठेवायला दिलेल्या गोष्टी विनातक्रार परत केल्या. चांगल्या मनाने व भावनेने दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. जाताना त्यांनी महिला काझींचे आभार मानले.

स्त्रियांना जे क्षेत्र खुले नव्हते, तिथे महिला काझींनी शिरकाव केला आहे. आजपर्यंत असंख्य वेळा निकाह किंवा तलाकाच्या वेळी स्त्रियांचे हक्क डावलले गेले आहेत. आजपर्यंत पुरुष काझी हा निर्णय़ घेत होते, त्यांना समाजमान्यताही होती. आता प्रशिक्षित महिला काझींनी घेतलेल्या निर्णयाचाही स्वीकार होईल.

- नूरजहाँ, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज