अ‍ॅपशहर

पहिला प्रयोग डमीवर, नंतर रुग्णांवर

मेडिकल कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये शेकडो प्रकारच्या रुग्णांना हाताळता येते, विविध प्रकारच्या आजारांची माहिती...

Maharashtra Times 15 May 2018, 5:08 am
चार मेडिकल कॉलेजांमध्ये अनुकरणीय प्रयोगशाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम medical-colleges


Sharmila.kalgutkar@timesgroup.com

Twitter - @ksharmilaMT

मुंबई : मेडिकल कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये शेकडो प्रकारच्या रुग्णांना हाताळता येते, विविध प्रकारच्या आजारांची माहिती या 'केसस्टडी'मधून मिळत असते. मात्र काही वेळा शिकाऊ डॉक्टरांनी केलेल्या या 'प्रयोगां'मुळे रुग्ण रडकुंडीला येतात. आता मात्र हे चित्र बदलणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील चार मेडिकल कॉलेजांमध्ये अनुकरणीय प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये असलेल्या 'डमी' रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रियेचा सराव केल्यानंतर त्यांनी रुग्णांना हाताळणे अपेक्षित आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने यासाठी मान्यता दिली आहे. राज्यात येत्या वर्षांपासून अशा अनुकरणीय प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत.

रुग्णांचे डमी ज्या प्रयोगशाळेत ठेवण्यात येतात, त्याला अनुकरणीय (सिम्युलेशन) प्रयोगशाळा म्हणतात. प्लॅस्टिकच्या या मॉडेल्सच्या आता विशिष्ट प्रकारची वैद्यकीय सॉफ्टवेअर यंत्रणा विकसित केलेली असते. वेगवेगळ्या आजारांसाठी ही यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारची असते. प्रसुतिरोग, एन्डोस्कोपी, अपेन्डिक्स, लॅप्रोस्कोपी, पित्ताशयाच्या शस्त्रक्रियांमध्ये आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया या 'डमी' मॉडेल्सवर पूर्णपणे करून पाहता येते. या 'डमी'च्या अंतर्गत भागात रक्तवाहिन्यांचे जाळे, धडधडणारे हृदयही सॉफ्टवेअरच्या आधारे बसवण्यात येते. आयव्ही लावण्यापासून ते प्रत्यक्ष रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यापर्यंतची सगळी प्रात्यक्षिके शिकाऊ डॉक्टरांना या डमीवर दिली जातात. आयव्ही चुकीच्या ठिकाणी लागला, तर डमीमधील रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर येते. हृदयाची धडधड वाढते. त्यामुळे वास्तवातील रुग्णाला आजारांमध्ये जी लक्षणे, जो त्रास होईल, तोच या डमीमध्ये दिसतो. त्यामुळे रुग्ण हाताळताना शिकाऊ डॉक्टरांकडून काही वेळा होणारा वैद्यकीय त्रास या प्रक्रियेमुळे कमी होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली. पहिल्या टप्प्यांत राज्यातील चार मेडिकल कॉलेजांमध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. त्यासाठी किमान आठ कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित आहे.

हायटेक तंत्रज्ञानाचा वापरा

या प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजांमध्ये वापरण्यात आले. डॉ. संजय ओक यांच्या मते हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात पुढचे पाऊल आहे. थेट रुग्णावर उपचार न करता, वॉर्ड वा शस्त्रक्रिया थिएटरमध्ये केल्या जाणाऱ्या प्रक्रिया हायटेक तंत्रज्ञानाच्या वापराने या डमीवर करण्यात येतो. भूलशास्त्र, लॅप्रोस्कोपी, हदयविकार या प्रत्येकामध्ये अशा प्रकारचे सिम्युलेशन उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज