(फोटो adani नावाने q मध्ये)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
अदानी वीज कंपनीच्या चढ्या वीज बिलांविरोधात साकीनाक्यातील जनतेने रस्त्यावर उतरून निषेध केला, तसेच कंपनीच्या साकीनाका येथील वीज केंद्रावर मोर्चाही काढला.
राष्ट्रीय एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अब्बास मिर्झा यांनी आयोजित केलेल्या आंदोलनात एकत्र आलेल्या नागरिकांनी अदानी वीज कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली. जरीमरी येथून निघालेला मोर्चा साकीनाका येथील अदानी वीज कंपनीच्या कार्यालयावर धडकला. 'जरी सरकारने अदानी वीज कंपनीची चौकशी सुरू केली असली तरी ज्या पद्धतीने लूटमार सुरू आहे, ती सहन केली जाणार नाही. जनतेचा कष्टाचा पैसा लुटण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात जनता आंदोलन करील', असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिला. 'अदानी कंपनीने आपले सर्व व्यवहार पारदर्शक करत एकूण खर्च आणि एकूण नफा याचा ताळेबंद वेबसाइटवर अपलोड केल्यास जनतेला वस्तुस्थिती आणि सत्यपरिस्थिती ज्ञात होईल', असेही ते म्हणाले. यावेळी प्रत्येकाला स्वतंत्र वीज मीटर आणि अचूक मीटर रीडिंग करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी कंपनीच्या अधिकारी संपदा जैन यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.