अ‍ॅपशहर

मुंबई: गोरेगाव, गिरगावात ‘क्रेन’कोंडी

रेल्वेसेवा बिघडल्याने किंवा रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने रखडपट्टी होण्याचा अनुभव मुंबईकरांसाठी नवा नाही. मात्र, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांनी दोन ठिकाणी 'क्रेन'कोंडी अनुभवली.

Maharashtra Times 15 Apr 2018, 11:25 pm
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Crane-Collapse


रेल्वेसेवा बिघडल्याने किंवा रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने रखडपट्टी होण्याचा अनुभव मुंबईकरांसाठी नवा नाही. मात्र, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांनी दोन ठिकाणी 'क्रेन'कोंडी अनुभवली. गोरेगाव येथील एस.व्ही. रोडवर उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना सकाळी पावणे सातच्या सुमारास क्रेनचा तोल जाऊन ती कोसळली तर, सायंकाळी गिरगावात ठाकूरद्वार येथे मेट्रोच्या कामावर असलेल्या क्रेननेही तोल गेल्याने लोटांगण घातले. या घटनांमुळे दोन्ही भागांत वाहतूक कोंडी झाली मात्र, सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकरांना फार हाल सोसावे लागले नाहीत.

गोरेगावात एस.व्ही. रोडवरील 'एमटीएनएल'जवळच्या उड्डाणपुलासाठी गर्डर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी प्रचंड क्षमतेची क्रेन मागवण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर पावणेसातच्या सुमारास क्रेनचा तोल गेला आणि ती अक्षरश: सरळ रेषेत उभी राहिली. पोलिसांनी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली. पण, या दुर्घटनेमुळे सकाळी किमान चार तासांसाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळच्या सुमारास थोड्या वेळासाठी एमएटीएनएलजवळील रस्ता बंद ठेवण्यात आला. तिथून जाणाऱ्या वाहनांना साईनाथ भुयारी मार्ग, मृणालताई गोरे पूल, चिंचोली बंदर येथून प्रवास करण्याची सूचना वाहतूक पोलिसांनी केली.

ही दुर्घटना घडल्यानंतर सायंकाळी ठाकूरद्वार येथेही मेट्रोचे काम सुरू असताना तोल सुटून क्रेन कोसळली. त्यामुळेही संध्याकाळी या परिसरात चार-पाच तास वाहतूक कोंडी झाली होती. या दोन्ही अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज