अ‍ॅपशहर

लोकल प्रवासासाठीचा ट्रॅव्हल पास कधीपासून लागू होणार?

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रेल्वे प्रवासासाठी घोषित केलेल्या युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासच्या आधारे तिकीट देण्याची प्रक्रिया आठवड्यानंतरदेखील सुरू झालेली नाही.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 1 Jul 2021, 9:19 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रेल्वे प्रवासासाठी घोषित केलेल्या युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासच्या आधारे तिकीट देण्याची प्रक्रिया आठवड्यानंतरदेखील सुरू झालेली नाही. बनावट पासला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ट्रॅव्हल पास घोषित केला, मात्र त्याची अंमलबजावणी कधीपासून करायची याचा आदेश नसल्याने चुकलेल्या धोरणात ट्रॅव्हल पासचीही भर पडली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai local (1)


दैनंदिन व्यवहार, बाजारपेठा सुरू केल्यानंतरही सर्वसामान्य नोकरदारांवर लोकलबंदी कायम ठेवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. रस्तामार्गे होणारा प्रवास खर्चिक असल्याने अनेकांनी बनावट ओळखपत्र-पासने रेल्वे प्रवास सुरू केला. आपत्ती व्यवस्थापन विभागाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना २४ जूनला पत्र पाठवले. 'मुंबई महापालिकेने उपनगरी रेल्वे, मेट्रो, मोनो प्रवासासाठी निर्बंध जाहीर केले आहेत. बनावट पासने प्रवास करणाऱ्यांची गर्दी रोखण्यासाठी आपत्ती विभागाने युनिव्हर्सल ट्रॅव्हस पास यंत्रणा तयार केली आहे. लोकल प्रवासासाठी ट्रॅव्हल पास बंधनकारक आहे. ही यंत्रणा लवकरच लागू करण्यात येणार असून त्याची तारीख रेल्वेला कळविण्यात येईल', असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले.

पत्राच्या ७ दिवसानंतरही आपत्ती विभागाकडून ट्रॅव्हल पास नेमका कधी उपलब्ध होणार याची माहिती मिळालेली नाही. यामुळे सध्या जुन्या पद्धतीनूसार अर्थात, ओळखपत्र पाहूनच लोकलचे तिकीट अथवा मासिक प्रवासी पास देण्यात येत आहे.

सरकारने पाठवलेले युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासचे पत्र रेल्वे प्रशासनाला मिळाले. अवैध प्रवाशांविरोधात रेल्वेने वेळोवेळी कठोर पावले उचलली आहेत. ट्रॅव्हल पासने अद्याप तिकीट देण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. राज्य सरकारने सांगितलेल्या तारखेनंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे, असे मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

ट्रॅव्हल पास यंत्रणा कोणत्या तारखेपासून सुरू होणार, ट्रॅव्हल पाससाठी किती जणांनी अर्ज दाखल केले, याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

पासची प्रक्रिया केवळ इंग्रजीत

स्थानिक, राज्य, केंद्र सरकारी ओळखपत्र असलेल्या आणि ट्रॅव्हल पास असलेल्यांनाच लोकलमध्ये प्रवेश द्यावा, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सफाई कर्मचारी, खासगी रुग्णालयातील, रक्तपेढ्यामधील बहुतांश चतुर्थ श्रेणी कामगारांना इंग्रजी लिहिता-वाचता येत नाही. या पाससाठी २० प्रश्नांची इंग्रजीत उत्तरे भरायची आहेत. त्यानंतर ओटीपी, फोटो अपलोड करायचे आहेत. या नंतर ट्रॅव्हल पास मिळेल. हा खटाटोप लक्षात घेता 'भीक नको पण कुत्रं आवर' अशा मनस्थितीत चतुर्थ श्रेणीतील कामगार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज