अ‍ॅपशहर

मुंबई, कोकणात तुफान पाऊस; मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

कोकण किनारपट्टीसह पश्चिम आणि मंध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे कोकणात अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2022, 11:05 am
मुंबई : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heavy rain in mumbai and konkan coast cm eknath shinde orders district collectors
मुंबईसह कोकणात तुफान पाऊस, मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश


रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी, तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कोकणातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत आहे. या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पावसामुळे 'हा' मार्ग बंद, NDRF च्या पाच तुकड्या दाखल

मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटद्वारे माहिती देण्यात आली आहे. वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहोचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत. पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

Heavy Rain: कोल्हापुरात मुसळधार पाऊस; पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज