अ‍ॅपशहर

मी दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो; राऊतांवरील कारवाईनंतर सोमय्यांचा खुलासा

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2022, 4:09 pm
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने टाच आणली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील राहत्या घराचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'ईडी कारवाईचा अंदाज आल्याने संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी ५५ लाख रुपये ईडी कार्यालयात जमा केले होते. गेल्या दोन महिन्यांपासून राऊत धावपळ सुरू होती, पत्र लिहिलं जात होतं. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही,' असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी किरीट सोमय्या यांनी त्यांच्या दिल्ली भेटीबाबतही माहिती दिली आहे. (Kirit Somaiya On Sanjay Raut)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sanjay Raut and Kirit Somaiya
संजय राऊत - किरीट सोमय्या


'संजय राऊत यांचे स्नेही आणि व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राऊत यांनी धावपळ सुरू केली होती. राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात मोठी रक्कम कशी आली, याची चौकशी करण्याची मागणी आम्ही केली होती. प्रवीण राऊत प्रकरणातही संजय राऊत यांची काय भूमिका आहे, याचा तपास करण्यात यावा, अशी मागणीही मी दिल्लीत ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून केली होती,' असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Sanjay Raut : ईडीकडून संपत्ती जप्त, मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा संजय राऊत यांना फोन

'मुख्यमंत्र्यांनी जाब का विचारला नाही?'

'संजय राऊत यांना वाटलं की ५५ लाख रुपये ईडी कार्यालयात जमा केल्याने आणि ईडीच्याच अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई टाळली जाईल. मात्र जेव्हा राऊत यांनी पैसे ईडी कार्यालयात जमा केले होते तेव्हाच त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचं स्पष्ट झालं होतं. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना जाब का विचारला नाही,' असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची कारवाई ईडीकडून करण्यात आल्यानंतर राऊत यांना अटकही करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे सर्वच नेते आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज