अ‍ॅपशहर

आदिलशाहची गणपती व सरस्वतीस्तुती मराठीत

विजापूरच्या आदिलशाहीचा इब्राहिम आदिलशाह दुसरा हा अकबराच्या तोडीचा नेता होता तो केवळ अभ्यासकच नाही तर संगीताचाही दर्दी होता तो वादक, गायकही होता... तो वादक, गायकही होता. तो सरस्वतीचा उपासक होता. या इब्राहिम आदिलशहाने सरस्वती आणि गणपतीची स्तुती करणारी गाणी रचली होती.

Edited byअनुजा चवाथे | Maharashtra Times 6 Dec 2022, 9:04 am
मुंबई : विजापूरच्या आदिलशाहीचा इब्राहिम आदिलशाह दुसरा हा अकबराच्या तोडीचा नेता होता. तो केवळ अभ्यासकच नाही तर संगीताचाही दर्दी होता. तो वादक, गायकही होता. तो सरस्वतीचा उपासक होता. या इब्राहिम आदिलशहाने सरस्वती आणि गणपतीची स्तुती करणारी गाणी रचली होती. किताब-ए-नवरस हे पुस्तक त्याने ४०० वर्षांपूर्वी लिहिले होते. यात ६५ गीतरचना आहेत. त्यातील ३५ ते ४० गीतांमध्ये गणपती आणि सरस्वतीची स्तुती आहे. एका मुस्लिम राज्यकर्त्याने गणपती आणि सरस्वतीच्या केलेल्या या स्तुतीपर रचना आता मराठीतही उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून हे पुस्तक लवकरच मराठी वाचकांपर्यंत पोहोचेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adi shah
आदिलशाहची गणपती व सरस्वतीस्तुती मराठीत


या पुस्तकावर संशोधक अरुण प्रभुणे यांनी चार वर्षांपूर्वी या काव्यग्रंथावर काम सुरू केले. उर्दूचे अभ्यासक असल्याने किताब-ए-नवरसबद्दल त्यांना उत्सुकता होती. मात्र हे कुठे उपलब्ध होईल त्याची माहिती मिळत नव्हती. हे पुस्तक दखनी उर्दू भाषेमध्ये आहे. इब्राहिम आदिलशाह दुसरा याने मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठीही प्रयत्न केले होते. ४०० वर्षांपूर्वी मुस्लिम राज्यकर्त्याने हे प्रयत्न केले होते, मात्र ही बाब जगासमोर आली नाही. याचा अधिक अभ्यास करताना प्रभुणे यांना किताब-ए-नवरस हा ग्रंथ हैदराबादच्या सालारजंग वस्तुसंग्रहालयामध्ये उपलब्ध झाला. हे पुस्तक मिळवले आणि त्याचे फोटो काढले. मात्र यातील लेखन समजत नसल्याने डॉ. याह्यान नशीत यांच्या मदतीने या पुस्तकातील रचनांचा अनुवाद करण्यात आला. २०१६ साली अहमदपूर येथून निघणाऱ्या अक्षर वाङ्मय या नियतकालिकामध्ये हा अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला. या अनुवादासोबतच काही समीक्षात्मक लेखही यात समाविष्ट करण्यात आले होते. हा ग्रंथ संगीताच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे ते नमूद करण्यात आले.

या ग्रंथाचे महत्त्व साहित्य संस्कृती मंडळाच्या लक्षात आले. याबद्दलची काही माहिती दहावीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मग सालारजंग वस्तुसंग्रहालयाला हा संपूर्ण ग्रंथ फोटो काढून पाठवण्याची विनंती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सरकारने, डॉ. विद्या देवधर यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर या पानांचे फोटो प्रभुणे यांच्यापर्यंत पोहोचले. आता ४०० वर्षांनंतर हा ग्रंथ लोकांसमोर फोटोस्वरूप, अनुवाद आणि समीक्षात्मक स्वरूपात येणार आहे. पुढील आठवड्यात हे काम साहित्य संस्कृती मंडळाकडे सोपवले जाण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर लवकरच हे साहित्य मराठी वाचकांपर्यंतही पोहोचेल. मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने हा मौलिक ग्रंथ आहे. याचा इंग्रजीत अनुवाद झाला आहे मात्र हा मूळ ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचला नव्हता. त्याचे फोटो साहित्य-संस्कृती मंडळाच्या पुस्तकात समाविष्ट झाल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे.

सर्वधर्म समभावाचे उदाहण

या राज्यकर्त्याची अनेक गीते गणपती, सरस्वती स्तुतीवर आधारित आहेत. त्यांच्या लेखनामुळे श्रेष्ठ दर्जाचे साहित्य मराठीमध्ये येत आहे. आजच्या काळात या माध्यमातून सर्वधर्म समभावाचे उदाहरणही लोकांसमोर घालून दिले जाईल, असे मत साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड आणि प्रकल्प प्रमुख अरुण प्रभुणे यांनी व्यक्त केले. या राज्यकर्त्याच्या ठरावावर नाममुद्राही सरस्वतीची होती. हिंदू-मुस्लिम संस्कृती किती एकोप्याने नांदत होती हे या माध्यमातून सिद्ध होईल. उर्दू-मराठी आणि दोन्ही वाचकांना या ग्रंथाचा फायदा होईल, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज