अ‍ॅपशहर

दोन प्राप्तिकर महिला अधिकाऱ्यांना शिक्षा

सात वर्षांपूर्वी ठाण्यातील एका बिल्डरला प्राप्तिकराच्या मुद्द्यावरून 'ब्लॅकमेल' करत त्याच्याकडून एक कोटी ७० लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाची अतिरिक्त आयुक्त सुमित्रा बॅनर्जी, सहायक आयुक्त अंजली बांबोले व सुमित्राचे पती सुब्रतो यांना विशेष सीबीआय न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

Maharashtra Times 29 Jun 2018, 7:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bribe


सात वर्षांपूर्वी ठाण्यातील एका बिल्डरला प्राप्तिकराच्या मुद्द्यावरून 'ब्लॅकमेल' करत त्याच्याकडून एक कोटी ७० लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाची अतिरिक्त आयुक्त सुमित्रा बॅनर्जी, सहायक आयुक्त अंजली बांबोले व सुमित्राचे पती सुब्रतो यांना विशेष सीबीआय न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सुमित्रा व अंजलीला प्रत्येकी पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावतानाच ८० लाख व ४० लाखांचा दंड आणि सुब्रतोला चार वर्षांची शिक्षा व ३० रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली.

सीबीआयच्या आरोपांनुसार, 'तुम्हाला २५ कोटींचा प्राप्तिकर भरणे आहे', असे ठाण्यातील राम डेव्हलपर्सच्या मालकाला सांगून या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दोन कोटींची मागणी एप्रिल-२०१०मध्ये केली होती. सुमित्रा ही ठाणे प्राप्तिकर विभागात कार्यरत होती आणि तिच्या देखरेखीखाली या कंपनीचे सर्वेक्षण झाले होते. त्यामुळे पैसे न दिल्यास ही सर्वेक्षणाची कार्यवाही झडती कार्यवाहीमध्ये बदलू आणि तुमची बेहिशेबी मालमत्ता जप्त करू, अशी धमकी सुमित्रा व अंजलीने मालकाला दिली होती. तसे व्हायचे नसेल तर दोन कोटी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. अखेर ही रक्कम एक कोटी ७० लाखांपर्यंत कमी करण्यास दोघी तयार झाल्या आणि त्यांनी सुमित्राच्या पतीला पैसे आणायला पाठवले. बिल्डरने मात्र या व्यवहारासंदर्भात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) आधीच तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, एसीबीने सापळा रचून सुब्रतोला रंगेहाथ ताब्यात घेतले आणि तिघांनाही अटक केली. खटला सुरू असेपर्यंत हे तिघे जामिनावर होते. सरकारी पक्षाने या खटल्यात १४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून आरोपींविरोधातील गुन्हा सिद्ध केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज