अ‍ॅपशहर

आश्रमशाळांतील मृत्यूंमध्ये वाढ; साडेपाच वर्षांत 'इतक्या' विद्यार्थ्यांनी गमावला जीव

आश्रमशाळांमधून झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे नाशिकमधील आश्रमशाळांमध्ये झाले आहेत. त्यांची एकूण संख्या २७८ असून, यात १४४ मुलगे व १३४ मुली आहेत. नाशिकच्या खालोखाल नागपूरमध्ये १७१ विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहे.

Authored byशर्मिला कलगुटकर | महाराष्ट्र टाइम्स 12 Jan 2023, 5:50 am
मुंबई : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी मुलांना शिक्षणासह जगण्याचा आधार मिळावा या उद्देशाने सुरू झालेल्या शासकीय आश्रमशाळांमधील ६८० मुलांचा गेल्या जवळपास साडेपाच वर्षांमध्ये मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यापैकी २८२ मुलांचे मृत्यू विविध आजारांमुळे झाले आहेत. या मुलांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे उपलब्ध असलेल्या माहितीमधून दिसून येते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashram school
आश्रमशाळांतील मृत्यूंमध्ये वाढ; साडेपाच वर्षांत इतक्या विद्यार्थ्यांनी गमावला जीव


राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तालयाने दिलेल्या माहितीमध्ये फेब्रुवारी, २०१७ ते जून, २०२२ या पाच वर्षे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये ६८० विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत. या मृत्यूंची २२ वेगवेगळी कारणे नोंदवली असून, त्यात सर्वाधिक मृत्यू हे आजारपणामुळे झाले आहेत. मुलांचे आरोग्य, कुपोषण आणि हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘समर्थन’ या सामाजिक संस्थेने माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मागवली होती.

‘सरकार दखल घेणार का?’

‘शासकीय आश्रमशाळांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे मृत्यू होणे लाजिरवाणे आहे. समाजाच्या उतरंडीमध्ये ज्या घटकाला आवाज नाही, त्या बालकांच्या मृत्यूची दखल हे सरकार तरी घेणार का,’ असा प्रश्न ‘समर्थन’ संस्थेचे समन्वयक रूपेश कीर यांनी केला आहे.

अशी कारणे, असे मृत्यू

- ९९ विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला असून एकूण मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकस्मात मृत्यू पावलेल्या मुलांचे प्रमाण १४.५८ टक्के आहे. अपघातामुळे ५७ विद्यार्थ्यांनी प्राण गमावले असून, त्यात ४५ मुले तर १२ मुलींचा समावेश आहे.

- गळफास घेऊन मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या ४६ आहे. सर्पदंशामुळे ४५ तर, पाण्यात बुडून ३८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

- विषप्राशनामुळे १३ तर, विजेचा शॉक लागून १२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आठ मुलांनी आत्महत्या केली आहे.

- झाडावरून पडून सात, भाजल्यामुळे सहा, हृदयविकारामुळे चार तर, झोक्याने गळफास बसल्यामुळे चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून त्यात तीन मुलगे व एका मुलीचा समावेश आहे.

नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू

ठाणे, नाशिक व नागपूर व अमरावती विभागांतर्गत आश्रमशाळांमधून झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे नाशिकमधील आश्रमशाळांमध्ये झाले आहेत. त्यांची एकूण संख्या २७८ असून, यात १४४ मुलगे व १३४ मुली आहेत. नाशिकच्या खालोखाल नागपूरमध्ये १७१ विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले असून, त्यामध्ये ९० मुलगे, तर ८१ मुली आहेत. ठाणे विभागातील आश्रमशाळांमध्ये १५० विद्यार्थ्यांना जीव गमावावा लागला असून, त्यात मुलांची संख्या ७८ तर मुलींची संख्या ७२ आहे. अमरावतीमध्ये ८० विद्यार्थ्यांपैकी ३६ मुलगे तर ४४ मुलींनी जीव गमावला आहे.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख