अ‍ॅपशहर

महिला कंडक्टरांना प्रसूतीसाठी वाढीव रजा

एसटीमध्ये कंडक्टर म्हणून काम करताना महिलांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून एसटी महामंडळाने खास प्रसूतीरजेबाबत नव्याने निर्णय घेतला आहे. त्यात महिला कंडक्टरना दोन अपत्यांपर्यंत प्रसूतीरजेस जोडून तीन महिन्यांची अतिरिक्त प्रसूतीरजा घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासह पहिल्या चार महिन्यांच्या कालावधीत बैठे काम देण्याबाबतही विभागीय पातळीवर निर्णय घेण्याची सूचना केली आहे.

Maharashtra Times 25 Mar 2018, 2:40 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम conductor


एसटीमध्ये कंडक्टर म्हणून काम करताना महिलांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून एसटी महामंडळाने खास प्रसूतीरजेबाबत नव्याने निर्णय घेतला आहे. त्यात महिला कंडक्टरना दोन अपत्यांपर्यंत प्रसूतीरजेस जोडून तीन महिन्यांची अतिरिक्त प्रसूतीरजा घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासह पहिल्या चार महिन्यांच्या कालावधीत बैठे काम देण्याबाबतही विभागीय पातळीवर निर्णय घेण्याची सूचना केली आहे.

राज्यातील रस्त्यांची स्थिती, ड्युटीमधील अडचणींमुळे महिला कंडक्टरांमध्ये गर्भपाताचे प्रमाण अधिक असल्याचा अहवाल सादर झाला होता. हे प्रमाण ६० टक्क्यांहून जास्त असल्याची आकडेवारी समोर आले होते. ही परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महिला कंडक्टरना दोन अपत्यांपर्यंत प्रसूतीरजेस जोडून आणखी तीन महिन्यांची सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यात, गरोदर असताना महिला कंडक्टरांना ठराविक महिन्यांपर्यंत सुरक्षित, सुस्थितीत असणाऱ्या मार्गांवर ड्युटी देण्याचीही सूचना आहे. त्यासाठी आगार व्यवस्थापकांनी निर्णय घ्यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणेच गरोदरपणाच्या कालावधीतील पहिल्या चार महिन्यांपर्यंत बैठे काम देण्याबाबतही विभागीय पातळीवर निर्णय घ्यावा, अशीही सूचना केली आहे. त्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधार घेण्यात येईल. संबंधित महिला कंडक्टरांचे शैक्षणिक अर्हता पाहून त्याप्रमाणे कार्यालयीन कामे देण्याचा समावेश राहणार आहे.

एसटी महामंडळाने प्रसूतीरजेस जोडून तीन महिन्यांची सुट्टी देण्याच्या निर्णयात एक वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या महिला कंडक्टरनाही सामावून घेण्यात आले आहे. तसेच, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रसूती रजेपैकी किती आणि कोणत्या कालावधीत रजा घ्यावी हे ठरवण्याचे अधिकार महिला कर्मचाऱ्यास राहणार आहे.

महामंडळाने घेतलेला हा निर्णय योग्य आणि महिला कंडक्टर वर्गास त्याचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज