अ‍ॅपशहर

Osmanabad: करोनाच्या संकटकाळात २७ एकल महिलांनी केले डोंगराएवढे काम

असंख्य अडचणींवर मात करून करोनाच्या संकटकाळातही २७ एकल महिलांनी एकत्र येऊन उस्मानाबाद येथे 'स्वावलंबी महिला नागरी सहकारी पतसंस्था' उभी केली.

Authored byशर्मिला कलगुटकर | महाराष्ट्र टाइम्स 8 Mar 2021, 7:41 am
मुंबई : असंख्य अडचणींवर मात करून करोनाच्या संकटकाळातही २७ एकल महिलांनी एकत्र येऊन उस्मानाबाद येथे 'स्वावलंबी महिला नागरी सहकारी पतसंस्था' उभी केली. लॉकडाउनमध्ये खाते उघडण्यासाठी ७१० रुपये भरणेही महिलांना शक्य नव्हते. सदस्यसंख्या अपुरी होती. तरीही, जिद्द न सोडता गावातल्या प्रत्येक घरात जाऊन महिलांना बचतीचे आणि गुंतवणकीचे महत्त्व पटवून देऊन सोळाशे जणींनी या संस्थेशी जोडून घेतले आहे!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम एकल महिलांच्या अर्थविश्वासाची पेढी


'कोरो'च्या माध्यमातून 'ग्रासरूट डेव्हलपमेंट फेलोशिप' कार्यक्रम महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सुरू आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तयार झालेले बाराशेपेक्षा अधिक कार्यकर्ते वाड्या, वस्त्या, गावागावांमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर कार्यरत आहे. यातून बाळसे धरलेल्या एकल महिला संघटनेमध्ये पहिल्या टप्प्यात २७ महिला होत्या. आज मराठवाड्यातील १९ हजार महिलांच्या साथीने हे रोपटे जोमाने वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये विजयाची पताका फडकवणाऱ्या एकल महिलांप्रमाणेच या पतपेढीचे बीज रोवणाऱ्या या महिलांवरही राज्याच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

'मराठवाडा विभागाच्या नऊ तालुक्यांतील १९ हजार महिलांना भेटलो. रोजगाराच्या प्रश्न सोडवण्यासाठी काही महिलांनी उद्योगधंदा सुरू करण्याच्या हेतूने भांडवलाची गरज असल्याचे लक्षात आले. मात्र, बँकेतून कर्ज घेता येत नसल्याची अडचण त्यांनी मांडली. स्वत:ची ओळखपत्रे आणि कागदपत्रे नसल्याने इच्छा असूनही लघुउद्योग सुरू करता येत नव्हता. त्यावर मात करण्यासाठी महिलांची पतपेढी सुरू करण्यात यावी ही संकल्पना पुढे आली,' असे 'कोरो'चे विभागीय समन्वयक राम शेळके सांगतात.

क्रेडिट सोसायटी सुरू करण्यासाठी किमान १५०० सदस्य असावे लागतात. लॉकडाउनमध्ये लोकांकडे रोजगार नसल्याने त्यांना ७१० रुपये भरून सदस्यत्व स्वीकारणेही मोठे आव्हान होते. तरीही, या महिलांनी सगळ्या नियमांचे पालन करून दारोदारी जाऊन महिलांना जोडून घेतले. या मोहिमेमध्ये १६३२ महिला यामध्ये जोडल्या गेल्या. त्यानंतर पुढील कामाला गती आली.

आजपर्यंत या महिलांनी एकल महिला म्हणून विविध पातळ्यांवर संघर्ष केला होता. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांना पती नसल्याने नाकारण्यात आले होते. वैयक्तिक राहणीमानापासून ते सामाजिक प्रक्रियेतील लोकसहभागापर्यंत अनेक पातळ्यांवर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, तरीही या महिलांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवून आर्थिक स्वावलंबनाचाही पाठ गिरवला. हे सांगायला 'कोरो'च्या लक्ष्मी वाघमारे विसरत नाही.

करून दाखवले


हे उदाहरण केवळ उस्मानाबादपुरते मर्यादित राहत नाही. या कामापासून प्रेरणा घेऊन अन्य ठिकाणीही अशा प्रकारे काम सुरू करण्याच्या कार्याला गती आली आहे. महिलांनी सक्षम व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी या पतपेढीच्या माध्यमातून राज्याच्या इतर जिल्ह्यामध्येही ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज