अ‍ॅपशहर

मुंबई पोलिसांच्या घरातील 'कन्यारत्न'

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी मुंबई पोलिस दलातील महिलांचा गौरव करण्यात येतो. मात्र यंदा प्रथमच पोलिस कुटुंबातील विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या महिलांना गौरविण्यात येणार आहे.

Authored byदीपेश मोरे | महाराष्ट्र टाइम्स 8 Mar 2021, 9:56 am
मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी मुंबई पोलिस दलातील महिलांचा गौरव करण्यात येतो. मात्र यंदा प्रथमच पोलिस कुटुंबातील विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या महिलांना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या मुली आणि बहिणींचा समावेश असून, यातील चौघींनी कमी वयात वेगवेगळ्या क्षेत्रांत ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे करोनाच्या संकटातही पोलिसाच्या मुलीने जिवाची पर्वा न करता करोनायोद्धयाची कामगिरी चोख पार पाडली. डॉ. पूनम भीमराव कांबळे, प्रेमलता लक्ष्मीकांत मोर्या, सायली सुनील आंब्रे, निकिता संजय पोटे, राधवी राकेश जाधव, डॉ. तेजल नंदकिशोर पेडणेकर अशी निवड झालेल्या महिलांची नावे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रातिनिधिक फोटो


मुलगीही करोनायोद्धा

मलबार हिल पोलिस ठाण्यातील हवालदार नंदकिशोर पेडणेकर यांची कन्या तेजल पेडणेकर ही डॉक्टर (बीएचएमएस) आहे. करोना रुग्णांसाठी पालिकेच्या वतीने मुलुंड येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या उपचारासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे चार ते पाच महिने तेजल हिने करोना योद्धा बनून रुग्णांची सेवा केली.

सौंदर्य स्पर्धांमध्ये चमक

सौंदर्य क्षेत्रात उतरणे आणि त्यामध्ये नैपुण्य मिळविणे हे सर्वसामान्य कुटुंबातील मुलींचे काम नाही, असे समजले जाते. मात्र कांजुरमार्ग पोलिस ठाण्यातील हवालदार संजय पोटे यांची मुलगी निकिता हिने आपले सौंदर्य, बुद्धिमत्तेच्या जोरावर 'सुंदर' अशी कामगिरी करून दाखवली आहे. आसनगाव येथे पॉलिटेक्निकच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या निकिताने मिस इंडिया ग्लोबल-२०२० या गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम पाचमध्ये येण्याचा मान पटकाविला आहे. एफबीबी मिस टीन कल्याण - २०१९, इंडिया नेक्स्ट टॉप मॉडेल (वेस्टर्न झोन), मिस फेस महाराष्ट्र -२०२० या अनेक स्पर्धामध्ये बाजी मारली आहे.

पोलिसाच्या घरात 'सीए'

भांडुप पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार सुनील आंब्रे यांची कन्या सायली अभ्यासात प्रचंड हुशार. त्यामुळे सुरुवातीपासूनच वडिलांनी तिला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. घेतली. आपले सर्व छंद जोपासत सायली हिने सीए बनण्याचे ठरविले. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकीच मुले या परीक्षेत पास होत असल्याने दुसरे क्षेत्र निवड असे अनेकजण सांगत होते. मात्र २२वर्षी सायलीने करून दाखविले आणि सीए परीक्षा उत्तीर्ण झाली.

जिम्नॅस्टिकमध्ये आघाडी

काही ठराविक खेळांकडेच मुलांचा किंवा त्यांच्या पालकांचा ओढा असतो. परंतु गावदेवी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक राकेश जाधव यांची १३ वर्षांची मुलगी राध्वी हिने 'जिम्नॅस्टिक'मध्ये चमक दाखवली आहे. अंधेरीच्या डिव्हाइन चाइल्ड हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या राध्वीने बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक संघटना, स्पर्धा २०१९-२०२०मध्ये कांस्य पदक पटकाविले. नृत्याची कला अवगत असलेली राध्वी ही हरीश परब यांच्याकडे ॲडव्हान्स जिम्नॅस्टिक शिकत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज