अ‍ॅपशहर

युरोप पर्यटनात जे. डे अलिप्त होते!

मिड डे चे पत्रकार जे. डे हे लंडनसह युरोपच्या पर्यटनाला गेले होते. त्यावेळी ते एकटेच होते आणि पर्यटन कालावधीत अन्य पर्यटकांमध्ये मिसळत नसत, अशी माहिती ‘राज टूर’च्या व्यवस्थापकाने बुधवारी साक्षीत न्यायालयापुढे दिली.

Maharashtra Times 8 Jun 2017, 1:43 am
खटल्यात टूर व्यवस्थापकाची साक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम j dey war reluctant in europe tour
युरोप पर्यटनात जे. डे अलिप्त होते!


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मिड डे चे पत्रकार जे. डे हे लंडनसह युरोपच्या पर्यटनाला गेले होते. त्यावेळी ते एकटेच होते आणि पर्यटन कालावधीत अन्य पर्यटकांमध्ये मिसळत नसत, अशी माहिती ‘राज टूर’च्या व्यवस्थापकाने बुधवारी साक्षीत न्यायालयापुढे दिली. या संदर्भात या साक्षीदाराने जे. डे यांना त्यांच्यासोबत कुटुंबातील व्यक्ती अथवा अन्य कुणी का नाही, असा प्रश्न केला होता. त्यावर जे. डे यांनी मानसिक ताण दूर करण्यासाठी पर्यटन करीत असल्याचे सांगितले होते. सात दिवसांसाठी ही टूर होती, असेही या व्यवस्थापकाने सांगितले. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यांची साक्ष घेतली.

फुटलेला साक्षीदार

या खटल्यात विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांचीही साक्ष झाली आहे. त्यांना पोल्सन जोसेफ या आरोपीने आंतरराष्ट्रीय कॉल केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. मात्र, घरत यांनी त्याविषयी विचारता सुनील राऊत यांनी संबंधित आरोपीचा कॉल घेतल्याचा इन्कार केल्याने त्यांना फुटलेला साक्षीदार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याच फोनवरून गँगस्टर छोटा राजन हा जे. डे. यांच्या हत्येनंतर पत्रकारांशी संपर्क साधत असल्याचे सीबीआयच्या तपासातून निष्पन्न होते.

‘मिड डे’चे पत्रकार जे. डे यांची पवई येथे ​११ जून, २०११ रोजी भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाली होती. या खटल्यात छोटा राजनसह अन्य आरोपींवर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आरोप निश्चित करण्यात आले होते. ‘चिंधी- रॅग्ज टू रिचेस’ या पुस्तकात जे. डे यांनी २० गँगस्टरच्या जीवनाचा आढावा घेतला होता. त्याशिवाय काही आक्षेपार्ह लिखाणामुळे संतापलेल्या छोटा राजन याने जे. डे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. छोटा राजन याला इंडोनेशियातील बाली विमानतळावर २५ ऑक्टोबर, २०१५ रोजी अटक करण्यात आली व तेथून त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. तेव्हापासून तो मुंबईसह दिल्लीतील सुमारे ७० खटल्यांसाठी दिल्लीच्या तुरुंगात आहे.

जे. डे. हत्या पहिल्या आरोपपत्रात सतीश कालिया, विनोद असरानी, पोल्सन जोसेफ व दीपक सिसोदिया हे आरोपी आहेत व नंतर मिड डेची पत्रकार जिग्ना व्होरा हिने छोटा राजन याला जे. डे च्या हत्येसाठी चिथावणी दिल्याच्या आरोपामुळे तिला अटक झाली होती. सध्या ती जामिनावर आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज