अ‍ॅपशहर

साहित्य संघ प्रकाशनाचा दुर्मिळ ठेवा डिजिटल रूपात

मराठी कविता कशी बदलत गेली, या कवितेने कोणती वळणे पाहिली, वृत्त-मात्रांकडून ती मुक्तकवितेपर्यंत कशी वाहत गेली याचे

Maharashtra Times 16 May 2018, 4:23 am
anuja.chawathey@timesgroup.com/ @anujaacMT
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sahitya-sangh


मुंबई

मराठी कविता कशी बदलत गेली, या कवितेने कोणती वळणे पाहिली, वृत्त-मात्रांकडून ती मुक्तकवितेपर्यंत कशी वाहत गेली याचे विश्लेषण सांगणारे वा. रा. ढवळे यांची मराठी कविता- प्राचीन कालखंड ११५० ते १८४० हे आणि मराठी कविता १९२० ते १९५० ही पुस्तके, कुसुमावती देशपांडे यांचे मराठी कादंबरी- पहिलले शतक १८५० ते १९५० हे पुस्तक असा साहित्यखजिना मुंबई मराठी साहित्य संघाने प्रकाशित केला होता. मात्र या पुस्तकांच्या केवळ एकेकच प्रती मुंबई मराठी साहित्य संघाकडे उपलब्ध होत्या. या पुस्तकांच्या वितरणाची जबाबदारी मौज प्रकाशनाने घेतली होती. त्यांच्याकडेही ही पुस्तके उपलब्ध नव्हती. म्हणून मुंबई मराठी साहित्य संघाच्या या २३ पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा खजिना पुन्हा एकदा साहित्यप्रेमींसाठी उपलब्ध झाला आहे.

मुंबई मराठी साहित्य संघाने मराठी अभ्यासकांना उपयुक्त ठरतील अशा समीक्षात्मक पुस्तकांची निर्मिती केली होती. साहित्य संघाचे सदस्य अशोक बेंडखळे यांना संघाच्या ग्रंथालयातील ही शेवटची प्रत कालौघात नष्ट होण्याची भीती जाणवली आणि त्यांनी या पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा निर्णय घेतला. साहित्य संघाचे प्रमुख सचिव डॉ. बाळ भालेराव, प्रमुख कार्यकारी अधिकारी उषा तांबे आणि साहित्य शाखेच्या सचिव डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांच्या मदतीने बेंडखळे यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली. यातील सर्वात जुने पुस्तक १९४६ सालचे आहे.

डिजिटाइज झालेल्या पुस्तकांमध्ये वामन मल्हार- वाङ्मय दर्शन, अर्वाचीन मराठी काव्य, अश्लीलता- एक परिसंवाद, मराठी ग्रंथाचे आदर्श संग्रहालय, रसास्वाद- वाङ्मय आणि कला, मातीची धरणे अशा विविध पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही २३ पुस्तके सध्या पीडीएफ पद्धतीने उपलब्ध करण्यात आली असून मुंबई मराठी साहित्य संघाच्या अक्षर साहित्य दालनात उपलब्ध आहेत. वाचकांना पीडीएफ प्रकारातील पुस्तके पेनड्राइव्हवर निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत असून त्याच्या छापील प्रतींसाठी प्रती पुस्तक १०० असा नाममात्र दर ठरवण्यात आला आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई मराठी साहित्य संघातील इतर दुर्मिळ पुस्तकांचा समावेश करण्याचा विचार आहे. साहित्य संघाकडे सुमारे १०० दुर्मिळ पुस्तके आहेत. ही पुस्तके ई-पब प्रकारात उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. सध्या साहित्य संघाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके वेबसाइटच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज