अ‍ॅपशहर

बहरलेल्या झाडाच्या बुंध्यावर कुऱ्हाड

आरे कॉलनीत कंत्राटदाराची मनमानी'फांद्या छाटण्याच्या' नावाखाली झाडावर घावम टा...

Maharashtra Times 21 May 2018, 4:00 am

आरे कॉलनीत कंत्राटदाराची मनमानी

'फांद्या छाटण्याच्या' नावाखाली झाडावर घाव

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

आरे कॉलनीमध्ये युनिट क्रमांक ३२च्या समोरील जिवंत गुलमोहराच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याने याविरोधात कंत्राटदार आणि अनुपस्थित महापालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या आधी केवळ धोकादायक आणि अडचणीच्या ठरू शकणाऱ्या फांद्या तोडण्याची परवानगी दिलेली असताना, या झाडाच्या सगळ्याच फांद्या छाटून टाकण्यात आल्या आहेत. ही परवानगी कोणत्या आधारे दिली आणि या पद्धतीने झाडावर कुऱ्हाड चालवण्याला केवळ फांद्याछाटणी म्हणायचे का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

आरेमधील डेरेदार गुलमोहराचे झाड कापण्याआधी त्यासंदर्भात आरे प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती किंवा त्यासंदर्भात परवानगीही घेण्यात आली नव्हती, अशी माहिती आरे प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. व्ही. राठोड यांनी दिली. हे झाड कापले जात असताना, त्या ठिकाणी महापालिकेचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. तसेच कंत्राटदारांकडे परवानगीसंदर्भातील कोणतीही कागदपत्रे नव्हती. हे झाड पोकळ झाल्याचे सांगून बुंध्यापर्यंत कापण्यात आले आहे, अशी माहिती आरेतील स्थानिक रहिवासी नीलेश धुरी यांनी दिली. यासंदर्भात आरे प्रशासन आणि पोलिसांच्या मागे लागून त्यांनी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र रविवारी २० मेच्या संध्याकाळपर्यंत याविरोधात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. एकीकडे सरकारच्या ५० कोटी वृक्षालागवडीबद्दल जोरदार चर्चा सुरू असताना, दुसरीकडे पूर्ण मोठे झालेले झाड जगवण्यासाठी प्रयत्न न करता त्याच्यावर थेट घाव घातला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नीलेश धुरी यांनी आरे प्रशासन, आरे पोलिस स्टेशन, राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे तक्रार नोंदवल्यानंतर शनिवारी आरेतर्फे सीईओ राठोड यांनी या झाडाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी हे झाड तोडण्यात आले नसून झाडाच्या केवळ फांद्या छाटण्यात आल्या आहेत, असे सांगितले. मात्र ज्या पद्धतीने बुंध्यापर्यंत फांद्या तोडण्यात आल्या आहेत, ते पाहता हे झाड आता जिवंत राहण्याची शक्यता धुसर असल्याचे निरीक्षण धुरी यांनी नोंदवले.

कागदपत्रे दाखवा

आरेमध्ये अशा पद्धतीने कोणतीही पूर्वसूचना आणि परवानगी न घेता अनेक झाडे तोडली जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. गुलमोहराच्या फांद्या किती इंचापर्यंत कापण्याची आणि किती व्यासाच्या फांद्या कापण्याची परवानगी दिली होती, त्याची कागदपत्रे उघड व्हावी. त्यानुसार कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. गुलमोहराच्या परवानगीशिवाय तोडलेल्या झाडानंतर आता पुढील फांद्याछाटणीसाठी महापालिकेकडून आरेची पूर्वपरवानगी घेण्यात येईल, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्याचीही घटनास्थळी उपस्थिती असेल, असे आश्वासन आरेला देण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज