अ‍ॅपशहर

कल्याण-डोंबिवली दरम्यान काही काळ लोकल बंद राहणार

कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या व या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या पत्रीपुलाचे ७७ मीटर लांबीचे गर्डर उभारण्यासाठी येत्या शनिवारी, रविवारी पॉवर-ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 19 Nov 2020, 8:02 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई/म. टा. वृत्तसेवा, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai Local Train


कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या व या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी कळीचा मुद्दा ठरलेल्या पत्रीपुलाचे ७७ मीटर लांबीचे गर्डर उभारण्यासाठी येत्या शनिवारी, रविवारी पॉवर-ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, हे दोन्ही दिवस कल्याण-डोंबिवलीदरम्यानची लोकलसेवा काही तासांसाठी बंद राहणार आहे. तसेच, २८ व २९ नोव्हेबर रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ५ या कालावधीतही याच कामामुळे लोकलसेवा काही तास बंद राहील.

सामान्यांना तूर्तास लोकलमुभा नसल्याने कोट्यवधी नागरिकांना रस्तेमार्गे प्रवासाचाच आधार आहे. यात कल्याणपल्याड राहणाऱ्या लाखो नागरिकांचा समावेश आहे. पत्रीपुलाचे काम सध्या सुरू असून त्यामुळे कल्याण परिसरात विलक्षण वाहतूककोंडी होत आहे. गर्डर उभारल्यानंतर या पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात येईल.

या कामासाठी मध्य रेल्वेकडून ४ ब्लॉक घेण्यात येणार आहे. पहिला आणि दुसरा ब्लॉक अनुक्रमे शनिवार, २१ नोव्हेंबर आणि रविवार, २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. सकाळी १०.१५ ते दुपारी २.१५ या काळात ब्लॉक काळातील कामे करण्यात येतील. यावेळी डोंबिवली ते कल्याण दरम्यान लोकलसेवा बंद राहील. तसेच, १८ मेल-एक्स्प्रेसच्या फेऱ्यांवर त्याचा परिणाम होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. टिटवाळा येथे ०२८१२ हतिया- लोकमान्य टिळक टर्मिनस, खडवली येथे ०१०९४ वाराणसी -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दिव्याजवळ ०२६१७ एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस सुमारे दोन तासांपर्यंत थांबवण्यात येतील.

या कालावधीत कल्याण-कर्जत/ कसारा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. ब्लॉक काळात छपरा, गोरखपूर, दरभंगा एक्सप्रेसच्या दिवा-वसई, जळगाव मार्गे वळवण्यात येतील.

रेल्वेने जाहीर केलेल्या मेगाब्लॉकनुसार रेल्वेच्या २५० फेऱ्या रद्द कराव्या लागणार असून या कामादरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कल्याण-डोंबिवली, ठाणे, तसेच नवी मुंबई महापालिका परिवहन, एस.टी. महामंडळाच्या अतिरिक्त बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एम.एस.आर.डी.ए. चे राधेश्याम मोपलवार, वाहतूक पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केली. कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे, ठाणे महानगरपालिका आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज