अ‍ॅपशहर

मुंबई IITचे क्वारंटाइन अॅप: 'विलग' नागरिकांवर नजर

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये असे वारंवार सांगण्यात येत असले तरी ते रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी मुंबई आयआयटीने एका अॅपची निर्मिती केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2020, 5:50 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus-app


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये असे वारंवार सांगण्यात येत असले तरी ते रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी मुंबई आयआयटीने एका अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या माध्यमातून विलगीकरण करण्याचा सल्ला दिलेली व्यक्ती नेमकी कोणत्या परिसरात आहे याची माहिती यंत्रणेला मिळू शकेल.

ज्या लोकांना विलग राहण्यास सांगण्यात आलेले नाही, त्यांनाही आपल्या परिसरात कोणी विलगीकरणाचा सल्ला दिलेली व्यक्ती आहे, का हेही समजू शकते. यामुळे या अॅपचा दुहेरी फायदा असल्याचे संशोधन टीमचे प्रमुख मंजेश हनवल यांनी सांगितले. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन शासनाने केले आहे. संसर्ग झाल्याचा संशय असणाऱ्या रुग्णांनी अधिकच काळजी घेणे आवश्यक आहे. तरीही रस्ता, बाजारपेठा येथे अजूनही वर्दळ दिसते. संशयित असल्यामुळे घरी विलग राहण्याची सूचना देण्यात आलेले नागरिकही बाहेर पडत असल्यामुळे यंत्रणेची चिंता आणि ताण वाढत आहे. यावर आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांनी 'क्वारंटाइन' या अ‍ॅपच्या माध्यमातून तोडगा दिला आहे. विलग करण्यात आलेले नागरिक नेमके कुठे आहेत, त्यांच्या परिसरातून ते बाहेर गेलेले नाहीत ना याचा माग या अ‍ॅपच्या माध्यमातून घेता येणार आहे. त्याचप्रमाणे जे नागरिक बाधित नाहीत, त्यांनाही बाधित नागरिकांशी संपर्क झाल्यास किंवा परिसरात असे नागरिक फिरत असल्यास त्याची माहिती मिळू शकेल. मंजेश हनवल यांच्यासोबत गणेश रामकृष्णन यांनी या अ‍ॅपची निर्मिती केली असून, आयआयटीचे माजी विद्यार्थी अस्विन गमी आणि पीएचडीचा विद्यार्थी आयुष महेश्वारी, अधिकारी अर्जुन साबळे यांनी सहकार्य केले आहे. मुंबई आयआयटीचे प्राध्यापक भास्करन रमण आणि कामेश्वारी छेब्रालू यांनीही 'क्वारंटाइन सेफ' अशाच स्वरूपाचे अॅप तयार केले आहे. घरीच थांबण्याचा सल्ला दिलेली व्यक्ती त्यांना घालून दिलेल्या नियमांचे पालन करते की नाही यावर लक्ष ठेवण्यास या अ‍ॅपची मदत होणार आहे.

आयआयटीमध्ये होणार हॅकेथॉन

कोविड-१९शी लढा देण्यासाठी मुंबई आयआयटीमध्ये कोविड-१९ हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात या आजाराशी लढण्यासाठी विविध संशोधन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातील विजेत्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी २ एप्रिलपर्यंत www.hackathon.e-yantra.orgवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- संशयितांच्या हालचालींवर लक्ष

- नागरिकांनाही माहिती मिळणार

- परिसरातील संशयितांची माहिती

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज