अ‍ॅपशहर

Marathi Language Day: पाकिस्तानातही माय मराठीचा डंका; कराचीत राजभाषा दिनाची लगबग!

Marathi Language Day: पिढ्यानपिढ्या कराचीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांची मराठी भाषेशी, मराठी संस्कृतीशी जोडण्याची इच्छा पूर्ण होत आहे. यंदाचा मराठी राजभाषा दिन यात एक महत्त्वाचा ठप्पा ठरणार आहे.

Authored byप्रगती बाणखेले | Edited byगजानन सावंत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2021, 10:28 am
मुंबई: पाकिस्तानातील कराचीमधल्या मराठी मंडळींमध्ये गेले काही दिवस लगबग सुरू आहे ती मराठी राजभाषा दिन सोहळ्याच्या आयोजनाची. कराची येथे राहणारे ५०० ते ६०० मराठी भाषिक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी हा कार्यक्रम ऑनलाइन होतो आहे. (Marathi Language Day In Karachi)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कराचीत मराठीचे ऑनलाइन धडे


पिढ्यानपिढ्या कराचीत राहणाऱ्या या मंडळींची नाळ मराठी संस्कृतीशी जोडलेली आहे. श्री महाराष्ट्र पंचायत या संस्थेच्या माध्यमातून ते एकमेकांशी घट्ट बांधलेले आहेत. महाराष्ट्रात त्यांचे नातेवाईक आहेत. जेजुरीचा खंडोबा अनेकांचं कुलदैवत आहे. त्यांच्या घरांत गणेश चतुर्थीला मोदक आणि दिवाळीला चकली, कानवल्यांचा फराळ होत असला तरी फाळणीनंतर जन्मलेल्या पिढ्यांचा इच्छा असूनही मराठी भाषेशी संपर्कच राहिला नाही. जाधव, गायकवाड, सांडेकर, खरात, नाईक अशी आडनावं असलेल्या नव्या पिढीच्या जिभेवरून मराठी हरवली असली तरी त्यांच्या हृदयात मराठी कायम आहे.

मराठी भाषेशी, मराठी संस्कृतीशी जोडण्याची त्यांची ही इच्छा पूर्ण होत आहे, साताऱ्यातील दिलीप पुराणिक, त्यांच्या पत्नी माधुरी आणि मुलगा स्वप्नील यांच्या माध्यमातून. यूट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून पुराणिक यांचा कराचीतील श्री महाराष्ट्र पंचायतीचे विशाल राजपूत यांच्याशी संपर्क झाला. अन्य मराठी मंडळींशीही ऑनलाइन ओळख झाली. त्यातून त्यांना मराठी भाषा शिकवण्याची कल्पना पुढे आली. माधुरी पुराणिक शिक्षिका होत्या, तर स्वप्नील स्पर्धा परीक्षेचे वर्ग चालवतात. झूम अॅपच्या माध्यमातून दर रविवारी मराठीचे वर्ग सुरू झाले. कराचीच नव्हे तर तिथून दुबई, मलेशिया या देशांत गेलेली मराठी मंडळीही सहकुटुंब या वर्गांना हजेरी लावतात. मुळाक्षरं, गाणी, सोपे शब्द अशी सुरुवात झाली आहे. एका रविवारी संजय जाधव यांनी सुरेल आवाजात “प्रथम तुला वंदितो...’ गायलं तर पार्वती शंकर गायकवाड यांनी ‘मेंदीच्या पानावर...' गाऊन सगळ्यांना सुखद धक्का दिला. हेमा जाधव आणि त्यांची शाळकरी मुलगी मिताली वर्ग चुकवत नाहीत. विनोद जाधव उर्दू आणि इंग्रजीतून मराठीच्या नोट्स काढतात. विशाल राजपूत मराठी मुळाक्षरांचा तक्ता समोर ठेवून ती गिरवतो आहे. देवानंद आणि सविता सांडेकर नियमित गृहपाठ करतात. वर्गात मराठी ऑडिओ क्लिप्स ऐकवल्या जातात.

आधी आपल्या भाषेला लोक हसतील म्हणून कानकोंडी होणारी ही मंडळी आता मोडके तोडके मराठी, उर्दू, इंग्लिशचा आधार घेत भरभरून बोलतात. पुढच्या मराठी राजभाषा दिनाच्या वेळी अस्खलित मराठीतून बोलण्याची त्यांची जिद्द आहे.
सध्या प्राथमिक स्तरावर मराठीचं शिक्षण सुरू आहे. कूपर इंडस्ट्रीज या उद्योग समूहाने दिलेल्या देणगीतून आम्ही काही मराठी पुस्तके आणि तक्ते कराचीला पाठवत आहोत. त्यातून शिकणे अधिक सोपे होईल
दिलीप पुराणिक, सातारा

शिवजयंतीचाही सोहळा

कराचीतील मराठीजनांना शिवाजी महाराजांबद्दल अतीव आदर आणि अपार उत्सुकता आहे. त्यांनी शिवजयंतीही साजरी केली. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली यांनी त्यांना शिवचरित्र ऐकवले. विठोबा, खंडोबा, यल्लम्माच्या दर्शनाची त्यांना आस आहे. एका रविवारी त्यांना जेजुरीच्या खंडोबाचे लाइव्ह दर्शन घडवण्यात आले. शाहू महाराज, महात्मा जोतिराव आणि सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्याविषयीही त्यांना माहिती दिली जात आहे.
गेली ७४ वर्षे आम्ही मूठभर लोक पाकिस्तानात मराठीपण टिकवून आहोत. आमची मुळं घट्टपणे मराठी मातीत आहेत. पण इतक्या वर्षांत आमची महाराष्ट्रात कुणाला आठवणही आली नाही, याचं दु:ख आहे. आता उशिरा का होईना, हे घडतं आहे, याचा खूप आनंद वाटतो. मी माझ्या तिन्ही मुलींसह मराठीच्या वर्गाला हजेरी लावतो.
विनोद जाधव, बँक कर्मचारी, कराची

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज