अ‍ॅपशहर

करोडोंचा चुंबक

दीपेश मोरेएक असा धातू जो चुंबकीय शक्तीमुळे भातामधील शीत खेचून घेतो हा धातू फारच मौल्यवान आणि दुर्मिळ असून तो उपग्रहांमध्ये वापरला जातो...

Dipesh More | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2019, 4:00 am

दीपेश मोरे

एक असा धातू जो चुंबकीय शक्तीमुळे भातामधील शीत खेचून घेतो. हा धातू फारच मौल्यवान आणि दुर्मिळ असून तो उपग्रहांमध्ये वापरला जातो. हजारो कोटी रुपये या धातूची किंमत असून जितक्या लांब अंतरावरून हा धातू भाताचे शीत खेचतो तितकी जास्त धातूची किंमत. वाचून थोडं अजब वाटलं ना. याला म्हणतात 'राइस पुलर'. करोडोंचा हा चुंबक राइस म्हणजे भात पूल करतो अर्थात खेचतो. हे दुसरे तिसरे काही नसून फसवणुकीची एक गुन्हे पद्धत असून यामध्ये अनेक बड्या व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.

अंधारलेली एक खोली... खोलीमध्ये शिरताच डोळ्याची जळजळ आणि अंगाला खाज... जास्त वेळ खोलीत राहिल्यास रक्ताच्या उलट्या... अंतराळात जाताना परिधान करतात तसा अँटी रेडिएशन सुट घातलेल्या व्यक्ती... मालाड पश्चिमेच्या एव्हरशाईन नगरमधील एका बंगल्यात हा सर्व प्रकार सुरू होता. जादूटोणा आहे की खरंच एखादी प्रयोगशाळा, काहीच कळत नव्हते. या बंगल्यात चार ते पाच व्यक्ती राहत असून त्यांची वागणूकही संशयास्पद वाटत होती. नेमकं या ठिकाणी काय सुरू आहे याची शहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ११ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रईस शेख, दत्तात्रय म्हसवेकर, सहायक निरीक्षक शरद झिने, नितीन उतेकर, विशाल पाटील यांच्या पथकाने बंगल्यात छापा टाकला. विकास सिंग, कलीम शेख, विप्लब हारण डे, साजीद शेख, शिवाजी तिवारी हे पाच जण संशयास्पद हालचाली करताना आढळले. बंगल्यातून इलेक्ट्रॉनिक साहित्य, वेगवेगळ्या धातूच्या वस्तू, रसायनांच्या बाटल्या, अँटी रेडिएशन सूट, प्रक्रिया केलेले तांदूळ, मोबाइल फोन, वेगवेगळ्या कंपनीची कागदपत्रे, शिक्के तसेच इतर साहित्य सापडले. हे सर्व साहित्य पाहून पोलिसही चक्रावले. विविध प्रकारच्या धातूंचे परीक्षण या प्रयोगशाळेत केले जाते, असे बंगल्यातील पाच जणांनी सांगितले. पोलिसांना काही खरे वाटेना आणि प्रयोगशाळा आहे तर त्यासाठीच्या आवश्यक परवानग्या कुठे आहेत. हे पाच जण खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. बंगल्यातून विविध प्रकारचे धातू मिळाले त्यामध्ये कॉपर इरेडियम हा धातू असल्याचे या पाच जणांनी सांगितले. त्याच धातूचे परीक्षण केले जात असल्याचे ते म्हणाले. ना कोणती पदवी ना परवानगी मग कसले परीक्षण? परीक्षण करणारा वैज्ञानिकही बोगस, त्यामुळे नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी या पाचही जणांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला त्यावेळी सर्व सत्य बाहेर आले आणि ते चक्रावून टाकणारे होते.

पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांनी मौल्यवान आणि दुर्मिळ धातूची खरेदी आणि परीक्षण करण्यासाठी 'फ्रँकलिन पावर मटेरिअल हँडलिंग सेंटर' आणि 'सुप्रीमो इंटरनॅशनल सेंटर' अशा दोन कंपन्या स्थापन करून त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्याची जाहिरातबाजी केली. इंटरनेटवर शोध घेतला तर अशा अनेक कंपन्या कार्यरत असल्याचे दिसते. या कंपनीच्या माध्यमातून ते दुर्मिळ धातू असलेल्या व्यक्तीला शोधून काढत. 'कॉपर इरेडियम' हा धातू जवळ असलेली एक व्यक्ती त्यांना सापडली. त्याला हा धातू विकायचा होता. त्यामुळे या पाचजणांनी जाहिरातबाजी सुरू केली. हा धातू नासा, इस्रो, डीआरडीओ आदी संशोधन संस्थांमध्ये वापरला जात असून खुल्या बाजारात मिळत नाही. या धातूची किंमत हजारो कोटी रुपयांमध्ये असल्याचे सांगितले जात होते. जाहिरातीच्या माध्यमातून विक्री करण्याबरोबरच त्यांनी खरेदी करणाराही शोधून काढला. 'कॉपर इरेडियम' या धातूची किंमत कशी ठरवणार यासाठी त्याचे परीक्षण करावे लागेल आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च येणार. विक्रेता किंवा खरेदी करणारा या दोघांची हा खर्च करण्याची तयारी नसल्याने त्यासाठी तिसरा गुंतवणूकदार शोधायचा. अंधेरी येथील एक बडा व्यावसायिक या पाचजणांच्या संपर्कात आला. त्याला या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठा फायदा मिळेल असे सांगण्यात आले. केवळ परीक्षण करण्यासाठीच गुंतवणूक करायची आहे असे सांगून त्यांनी व्यावसायिकाकडून चार कोटींपेक्षा अधिक रक्कम घेतली. दुप्पट- तिप्पट नफा मिळेल या आशेवर हा व्यवसायिक होता. परंतु विकणारा आणि खरेदी करणारा यामधील बोलणी फिस्कटली असून दुसऱ्या ग्राहकाच्या शोधात असल्याचे सांगून या व्यावसायिकाला आशेवरच ठेवण्यात आले. पण त्याची अशा अखेर धुळीस मिळाली कारण हे सर्व काही बोगसच होते.

'राइस पुलिंग' ही परदेशात प्रचलित असलेली गुन्हेपद्धत या पाच जणांनी आत्मसात केली होती. धातू विकणारा एखादा सापडला तर ठीक नाहीतर हेच विक्री करणारा आणि खरेदी करणारा तयार करतात. परीक्षण करण्यासाठी पैसे गुंतविणाऱ्या व्यावसायिकाला विश्वास बसवा यासाठी त्याला परीक्षणादरम्यान बोलविण्यात येत असे. एका खोलीमध्ये पूर्ण काळोख करून त्यामध्ये सूर्यफुलाचे तेल मोठ्या प्रमाणात टाकले जाते. या पाचजणांपैकी एक वैज्ञानिक बनून अँटी रेडिएशन सूट घालून तयार असतो तर एक दोघे तोंडामध्ये लाल रंगाचा द्रव घेऊन उभे राहत. बॅटरीच्या प्रकाशात व्यावसायिकाला अंधाऱ्या खोलीत नेले जाते आणि याचवेळी एखाद्या बॅटरीची काच फोडली जाते. या खोलीत प्रचंड रेडिएशन असल्याने काच फुटल्याचे भासविण्यात येते. सूर्यफुलाचे तेल ओतल्याने डोळ्याची जळजळ होते, अंगाला खाज येते. धातूमधून मोठ्या प्रमाणात अल्फा, बीटा, गॅमा ही किरणे उत्सर्जित होत असल्याने हे होत असल्याचे सांगितले जाई. त्यातच तोंडात लाल रंगाचा द्रव पदार्थ ठेवलेले दोघेजण ते तोंडातून बाहेर काढत आणि रक्ताची उलटी झाली असे नाटक करीत. त्यातच शिजवलेल्या तांदळातील भाताचे शीत घेऊन त्यामध्ये लोखंडाची तार आणि दुर्मिळ म्हणून ठेवण्यात येणाऱ्या धातूमध्ये लोहचुंबक बसवितात. भाताच्या शितामधील लोखंडाच्या तारेमुळे लोहचुंबक त्याला आपल्याकडे खेचून घेते. एक इंचावरून खेचले तर पाच ते सहा हजार कोटी आणि त्यापेक्षा लांबून खेचले तर सहा हजार कोटीपेक्षा अधिक किंमत या धातूची लावली जाते. हुबेहूब प्रयोगशाळा, शास्त्रीय पद्धतीने परीक्षण पाहून व्यावसायिक या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सहज तयार होतात. अशाच प्रकारे करोडोंच्या चुंबकाच्या साहाय्याने या पाच जणांच्या टोळीने एक डझनहून अधिक व्यावसायिकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. हा आकडा अधिक आहे मात्र गुंतवणूक केलेली रक्कम कोट्यवधीमध्ये असल्याने अनेक व्यावसायिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. राइस पुलिंग ही गुन्हे पद्धत आपल्यासाठी नवीन असली तरी यामध्ये अडकलेल्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि भूलथापांना बळी पडू नका.

लेखकाबद्दल
Dipesh More

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज