अ‍ॅपशहर

​सभा घेणारच…ती ही ठाण्यातच ! - मनसे

रस्त्यावरील सभेला परवानगी देणार नाही, अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली असल्याने 'आम्ही सभा घेणारच…तीही ठाण्यातच, येत्या १८ नोव्हेंबरला', असा इशारा मनसेने सोशल मीडियावरून दिला आहे.

Maharashtra Times 13 Nov 2017, 6:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mns meeting in thane on 18th november
​सभा घेणारच…ती ही ठाण्यातच ! - मनसे


फेरीवाला प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर येत्या १८ नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या जागेवरुन वाद सुरु झाला आहे. ठाणे पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळील किंवा तलावपाळी मार्गावर मनसेला सभा आयोजित करायची आहे. मात्र रस्त्यावरील सभेला परवानगी देणार नाही, अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली असल्याने 'आम्ही सभा घेणारच…तीही ठाण्यातच, येत्या १८ नोव्हेंबरला', असा इशारा मनसेने सोशल मीडियावरून दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी विविधप्रकारे अडथळे आणले जात आहेत, असा आरोप मनसेकडून होत आहे. जिथे एरवी इतर पक्षांच्या सभांना परवानगी मिळते तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच आडकाठी का? असा सवाल मनसेने सोशल मीडियावरून विचारला आहे. आमच्या लढ्यामुळे कुणाचे हितसंबंध दुखावलेत, माफियांचे की भ्रष्ट यंत्रणेचे? आम्हाला कल्पना आहे हे यंत्रणेचे दृष्टचक्र भेदताना हा लढा दडपण्याचा प्रयत्न होणार. भूमिका मांडण्यापासून अडवणूक करणे ही लोकशाही मुल्ल्यांची पायमल्ली नाही का?, अशी संतप्त भावनाही मनसेने व्यक्त केली आहे.



दरम्यान, 'जनहितार्थ महत्त्वाची माहिती' या मथळ्याखाली मनसेने एक पोस्ट अपलोड केली होती. त्यात म्हटले होते की, 'येत्या १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राज्य सरकार पुरस्कृत अघोषित लोडशेडिंग केलं जाणार आहे. त्यामुळं आपल्याकडचे जनरेटर्स, इनव्हर्टर्स आणि मेणबत्त्या तयार ठेवाव्यात'.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज