अ‍ॅपशहर

गोखलेंच्या सगळ्या भूमिका मला मान्य होत्या असं नाही पण... राज ठाकरेंकडून शब्दसुमनांची आदरांजली

तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रांत उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं. मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे, ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2022, 10:34 pm
मुंबई : भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच ‘विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhle) यांनी वयाच्या ७७ वर्षी एक्झिट घेतली. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठीसोबतच त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी, रंगभूमी, दूरचित्रवाणीवरील आपल्या दमदार कामगिरीने आदराचे आणि वेगळं स्थान निर्माण केले. प्रेक्षकांचीही कलाकाराच्या कलासाधनेत जबाबदारी असते, असं खडसावून सांगणारा सडेतोड भूमिका घेण्याचे धारिष्ट्य दाखवणारा कलाकार म्हणून ते परिचित होते. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विक्रम गोखले यांना शब्दसुमनांची आदरांजली वाहिलीये.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Raj Thackeray Vikram Gokhale
राज ठाकरे विक्रम गोखले


मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ. त्यात अनेकदा असं जाणवतं आलंय की अनेक अभिनेते जरी तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय हा कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे ह्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेकी उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातून देखील बोलण्याची त्यांची हातोटी कमाल होती.

तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रांत उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं. मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे, ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही. भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा हा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन...!


निर्भीडपणे मतं मांडणारा नट'सम्राट' गेला!

रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवर देखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख