अ‍ॅपशहर

मोबाइल, कम्प्युटरमधील उष्णतेतून वीजनिर्मिती

आपण वापरत असलेल्या मोबाइल किंवा कम्प्युटरमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेतून वीजनिर्मिती करण्यात आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांना यश आले आहे. यामुळे उपकरणांचे आयुष्य वाढण्यास मदत होईलच, शिवाय निर्माण होणाऱ्या विजेचा वापर तीच उपकरणे चार्ज करण्यासाठी होणार आहे.

Maharashtra Times 17 Apr 2018, 2:54 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mobile-computer


आपण वापरत असलेल्या मोबाइल किंवा कम्प्युटरमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेतून वीजनिर्मिती करण्यात आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांना यश आले आहे. यामुळे उपकरणांचे आयुष्य वाढण्यास मदत होईलच, शिवाय निर्माण होणाऱ्या विजेचा वापर तीच उपकरणे चार्ज करण्यासाठी होणार आहे. हे संशोधन 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून, जगभरातून त्याला मान्यता मिळत आहे.

मोबाइल, लॅपटाप किंवा कम्प्युटरचा वापर करतानाही ते गरम होण्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. या उपकरणांमध्ये वापरण्यात आलेली चिप तापते आणि ती गरम होतात. यामुळे उपकरणाचे आयुष्य कमी होते. तसेच त्यात निर्माण झालेली उष्णताही वाया जाते. यामुळे या उष्णतेचा वापर करून वीजनिर्मिती कशी करता येईल, यावर 'आयआयटी'मधील प्राध्यापकांनी संशोधन सुरू केले. या उपकरणांचा होणारा वाढता वापर लक्षात घेता, चिप्सच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या उर्जेचे प्रमाणही जास्त असणार आहे. या अतिरिक्त उर्जेचा निचरा करून 'तापविद्युत परिणाम' गुणधर्म वापरून तिचा वापर वीजनिर्मितीसाठी कसा होऊ शकतो, यावर संशोधन करण्यात आल्याचे डॉ. अनिकेत सिंघा यांनी सांगितले.

ही वीज निर्माण करण्यासाठी यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले आहेत. मात्र या सर्व प्रयत्नांमध्ये इलेक्ट्रोन विखुरले जाण्याचा धोका होता. यामुळे या संशोधकांनी यात एक गतिरोधक तयार करण्याचा विचार केला आणि त्यानुसार संशोधन केले. यामध्ये गणितीय साधने आणि क्वांटम मॅकेनिक्सचा वापर करण्यात आला आहे. या संशोधनामुळे कुठल्याही पदार्थाचे मूलभूत गुणधर्म, घनता आणि इलेक्ट्रोन्स वहनाचा वेग आणि सामान्य ऊर्जा स्थितीत परत येण्यासाठी इलेक्ट्रोन्सना लागणारा वेळ विचारात घेतले की किती क्षमतेचे गतिरोधक तयार करायचे हे समजले आहे. यामुळे वाया जाणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे, अशी अपेक्षा डॉ. सिंघा यांनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज