अ‍ॅपशहर

​ अभय देओलचा सोशल मीडियावर ‘फेअर’ वाद

काळ्या- सावळ्या रंगाच्या मुलींना न्यूनगंड देण्याचे काम जाहिरातीही करीत असतात. अशा जाहिराती करणाऱ्या सेलिब्रेटींचे कान टोचण्याचे काम अभिनेता अभय देओलने सोशल मीडियावरून चोख बजावले आहे.

Maharashtra Times 14 Apr 2017, 4:01 am
सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करणाऱ्या कलाकारांची कानउघाडणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai abhay deol objects to fairness cream advertisements
​ अभय देओलचा सोशल मीडियावर ‘फेअर’ वाद


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

सौंदर्याच्या कल्पना कालानुरूप बदलत गेल्या तरीही गोऱ्या त्वचेला देण्यात येणारे अवास्तव महत्त्व आजही कमी झालेले नाही. काळ्या- सावळ्या रंगाच्या मुलींना न्यूनगंड देण्याचे काम जाहिरातीही करीत असतात. अशा जाहिराती करणाऱ्या सेलिब्रेटींचे कान टोचण्याचे काम अभिनेता अभय देओलने सोशल मीडियावरून चोख बजावले आहे. फेअरनेस क्रीमच्या जाहिराती मागचापुढचा कोणताही विचार न करता गोरेपणाचा खोटा दावा करतात, शिवाय काळ्या रंगापेक्षा गोरा रंगच उत्तम असा छुपा संदेशही देत असतात, त्यातून नेमके काय साध्य होते, असा थेट सवाल अभयने उपस्थित केला आहे. या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला हे सांगणार नाहीत की हे चुकीचे आहे. गोरी त्वचा ही काळ्या किंवा सावळ्या रंगापेक्षा अधिक चांगली असते, अशा संकल्पना स्वीकारणे बंद केले पाहिजे, असे सडेतोड मत अभयने या खोट्या जाहिरातींना विरोध करताना व्यक्त केले.

अभय देओलने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, विद्या बालन, सोनम कपूर, जॉन अब्राहम यांची खिल्ली उडविली. विशिष्ट कलाकारांना लक्ष्य न करता फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींचे फोटो त्याने फेसबुकवर पोस्ट केले आहेत. इतर कलाकारांनी यावर मौन बाळगणे पसंत केले असले तरी दुखावलेल्या सोनम कपूरने मात्र ट्विटरवरून अभयला उत्तर दिल्याने त्यांची जुगलबंदी रंगली. परंतु अभयने तिला खडे बोल सुनावले. अभयला उत्तर देण्यासाठी सोनमने अभयची चुलत बहीण ईशा देओलचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ईशा एका फेअरनेस ब्रॅण्डची जाहिरात करताना दिसते. सोनमने हा फोटो ट्विट करुन त्यावर अभयची प्रतिक्रिया विचारली. सोनमच्या या ट्विटने विचलित न होता अभयने तेही चुकीचे असून या विषयावर मत जाणून घेण्यासाठी पोस्ट वाच, असाही सल्ला दिला. अभयने पोस्ट केलेल्या फोटोबद्दल स्पष्टीकरण देताना सोनमने ही जाहिरात १० वर्षांपूर्वी केल्याचे कबूल केले. मात्र या जाहिरातीचे परिणाम काय होतील, याची कल्पनाही नसल्याचे तिने सांगितले. हा सगळा प्रकार पुढे आणल्याबद्दल तिने अभयचे आभारही मानले हे विशेष. त्यावर अभयनेही सोनमला कलाक्षेत्रातील नैपुण्याचा प्रभावी वापर करून प्रतिभाशाली हो, असा सल्ला दिला. त्यानंतर सोनमनेही तिची सगळी ट्विट्स डीलीट करून टाकली. या दोघांमधील शाब्दिक जुगलबंदी संपली असली तरीही फेअरनेसचा हा सोशल धुराळा दिवसभर नेटिझन्समध्ये उडत राहिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज