अ‍ॅपशहर

नॅशनल पार्कात चार मोठ्या मगरी

रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मगरींची पिल्ले पकडली असतानाच, आता या उद्यान परिसरात अन्य चार मोठ्या मगरींचे अस्तित्व असल्याचे समोर आले आहे. यंदा जोरदार पावसामुळे तुळशी तलाव पूर्ण भरल्याने या तलावातून मगरी बाहेर आल्या आहेत.

Maharashtra Times 30 Jul 2016, 4:01 am
बोटिंग तलाव, चुनापाडा येथे आढळला वावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai crocodile in sanjay gandhi national park
नॅशनल पार्कात चार मोठ्या मगरी


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मगरींची पिल्ले पकडली असतानाच, आता या उद्यान परिसरात अन्य चार मोठ्या मगरींचे अस्तित्व असल्याचे समोर आले आहे. यंदा जोरदार पावसामुळे तुळशी तलाव पूर्ण भरल्याने या तलावातून मगरी बाहेर आल्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बोटिंगचा परिसर आणि तुंबीपाड्याजवळ चुनापाडा येथे चार मगरी असल्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले. या मगरीचा शोध वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, शैलेश देवरे, डॉ. शैलेश पेठे यांच्यासह लायनसफारी अधिकारी व टीमने घेतला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मगरी दिसत असल्याचे तिथे फिरायला जाणाऱ्यांनी निदर्शनास आणले होते. मात्र गेल्या रविवारी मगरींची दोन पिल्ले दिसल्यानंतर या दृष्टीने अधिक सजगपणे शोध सुरू झाला. यामध्ये बोटिंग परिसरात दोन मोठ्या मगरी दिसल्या. त्याशिवाय तुंबीपाड्याच्या पुढे १०० मीटर अंतरावर एक तुटलेला बंधारा आहे. तिथेही दोन मोठ्या मगरी आढळल्या आहेत.

या मगरींना पकडण्यासाठी सापळे लावले आहेत. मात्र पाण्याचा वेग सध्या खूप जास्त आहे. पाण्याचा वेग कमी झाल्याशिवाय या मगरी पकडता येणार नाहीत, असे सांगण्यात आले.

पर्यटकांना इशारा पावसामुळे सध्या बोटिंग बंद असले, तरी पाण्यात खेळण्याच्या उत्साहामुळे पर्यटक पाण्यात जातात. ‘पाण्यात उतरू नका’ अशी सूचना देणारे फलक राष्ट्रीय उद्यानात लावण्यात आले आहेत. मगरींच्या अस्तित्वामुळे पाण्यात न उतरण्याचे आवाहन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे मॉर्निंग वॉकर्स, पर्यटक यांना करण्यात आले आहे. तरीही काही वेळा या सूचनेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे दुर्घटनेचीही भीती आहे. या आधी २६ जुलै २००५ च्या प्रलयानंतरही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मगरींचे अस्तित्व आढळले होते.

गणेश विसर्जनापूर्वी पकडण्यासाठी प्रयत्न दरम्यान, आता गणेशोत्सव तोंडावर आल्याने आणि गणेश विसर्जनासाठी या तलावावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गणेशोत्सवापूर्वी या मगरी पकडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी वनखात्याचे अधिकारी, वनरक्षक या भागावर नजर ठेवून आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज