अ‍ॅपशहर

​ ‘झोलटाइम’ने उडवली झोप

अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली मुंबई आता ‘झोलटाइम’च्या सावटाखाली आहे. स्वस्तात मिळणाऱ्या आणि जास्त नशा आणणाऱ्या नवीन झोलटाइम या धोकादायक अंमली पदार्थाची तस्करी सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

Maharashtra Times 10 Jul 2017, 3:00 am
मुंबईत नव्या अंमली पदार्थाची तस्करी वाढली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai drugs jholtime becomes new headache for police
​ ‘झोलटाइम’ने उडवली झोप


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली मुंबई आता ‘झोलटाइम’च्या सावटाखाली आहे. स्वस्तात मिळणाऱ्या आणि जास्त नशा आणणाऱ्या नवीन झोलटाइम या धोकादायक अंमली पदार्थाची तस्करी सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. ‘एमडी’ ड्रग्जपाठोपाठ आता ‘झोलटाइम’चे सेवन

पार्ट्यांमध्ये होत असल्याचे केंद्रीय अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या (एनसीबी) निदर्शनास आले आहे. या तस्करीप्रकरणी माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे.

माहीम परिसरातून एका कार्गो कंपनीच्या मदतीने चार बॉक्स भरून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती कोलकाता एनसीबी युनिटला मिळाली. त्यानुसार नुकतेच कोलकाता विमानतळावरून संबंधित बॉक्स ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात दोन हजार कॅप्सुल्स सापडल्या. तपासणीत या कॅप्सुल झोलटाइमच्या असल्याचे निष्पन्न झाले. शहरात नवीन ड्रग्जची तस्करी उघड झाल्याने कोलकाता एनसीबीने या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचे ठरवले. तेव्हा कोलकाता एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा तपास माहीममधील जास्मीन मिल रोडवरील जास्मीन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सिद्द‌किी अली (४१) याच्यापर्यंत पोहोचला. मुंबईतून या ड्रग्जची तस्करी होणे कठीण असल्याने कोलकाता मार्गे हे ड्रग्ज परदेशात पाठवण्यामागे एक मोठे रॅकेट असल्याची कबुली अलीने दिली. शहरात आलेल्या या नव्या ड्रग्जने पोलिसांसह एनसीबीच्या डोकेदुखीत वाढ झाली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

काय आहे झोलटाइम?

झोलटाइम टॅबलेटमध्ये झोलपेडियम नावाचे प्रतिबंधक ड्रग आहे. हे ड्रग प्रतिबंधीत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय घेता येत नाही. रुग्णाला झोप येण्यासाठी या गोळ्यांचा वापर केला जातो. मात्र, त्याचा वापर पार्ट्यांमध्ये नशा करण्यासाठी केला जातो. त्यामुळे जगभरात हे ड्रग्स प्रतिबंधीत आहे. अमेरिका, युरोपमध्ये झोलपेडियमबाबतचे नियम खूप कडक असल्यामुळे ते मिळवणे शक्य होत नाही. आशियामध्ये या गोळ्यांबाबत जास्त जागृकता नसल्यामुळे येथून तस्करी करून या गोळ्या परदेशात नेल्या जातात. तेथे याला खूप मागणी आहे.

‘होश मे आओ मुंबई’ मोहिमेस सुरुवात

दिवसेंदिवस वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या विळख्यातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे ‘होश मे आओ मुंबई’ मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पोलिस रोड शो, पथनाट्यांच्या माध्यमातून व्यसनाचे दुरुपयोग पटवून सांगत जनजागृती करणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज