अ‍ॅपशहर

​ सुट्या कोकविक्रीस बंदी

मॅक्डोनाल्ड्स फॅमिली रेस्तराँमध्ये नळावाटे विकल्या जाणाऱ्या सुट्या कोका कोला-झिरो या शीतपेयाच्या विक्रीस अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बंदी घातली आहे.

Maharashtra Times 18 Mar 2017, 4:01 am
मॅक्डोनाल्ड्सला एफडीएचा दणका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai fda bans loose coca cola sale
​ सुट्या कोकविक्रीस बंदी


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मॅक्डोनाल्ड्स फॅमिली रेस्तराँमध्ये नळावाटे विकल्या जाणाऱ्या सुट्या कोका कोला-झिरो या शीतपेयाच्या विक्रीस अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बंदी घातली आहे. या शीतपेयामध्ये असलेले कृत्रिम मधुरतावर्धक (आर्टिफिशिअल स्वीटनर) हे गरोदर महिला, स्तनदा माता व काही विशिष्ट व्याधींच्या रुग्णांच्या जिवाला अपायकारक असल्याने कोणतीही सूचना नसलेल्या ग्लासांमधून कोकाकोला- झिरोचे वितरण करता येणार नाही, असा निकाल एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत देण्यात आला.

मे. हार्डकॅसल रेस्तराँ प्रा. लि. यांच्याशी संलग्न असलेल्या मॅक्डोनाल्ड्स फॅमिली रेस्तराँमध्ये कोणतीही सूचना न देता कृत्रिम मधुरतावर्धक असलेले कोकाकोला- झिरो हे कार्बोनेटेड शीतपेय वितरित केले जात असल्याचे कोल्हापूरमध्ये प्रथम उघड झाले होते. यापूर्वी या शीतपेयात कॅफिन असल्याची सूचना ग्लासवर नमूद करण्याची सूचना एफडीएने त्यांना दिली होती व त्याचे पालन त्यांनी केले होते. मात्र कोकाकोला-झिरोमधील या घटकांबाबत कोणतीही सूचना ग्लासावर दिली जात नव्हती आणि ते डिस्पेन्सर यंत्राद्वारे नळातून ग्लासामार्फत हॉटेलमधील ग्राहकांना वितरित केले जात होते.

कंटेनर, इशारा बंधनकारक

अन्नसुरक्षा व मानदे कायदा २०११ नुसार अशी कृत्रिम मधुरतावर्धक असलेली शीतपेये कंटेनरमध्येच विकली जावीत व त्यावर ‘कंटेन्स आर्टिफिशियल स्वीटनर’ तसेच ‘नॉट रेकमेन्डेड फॉर चिल्ड्रेन’ व ‘नॉट फॉर फेनिलकेटोन्यूरिक्स’ (मज्जासंस्थेच्या विकाराच्या रुग्णांना) असे नमूद करणे बंधनकारक आहे. परंतु शीतपेयांच्या ग्लासांवर तशी कोणतीही सूचना देण्यात येत नव्हती. त्यामुळे कोल्हापूरमध्ये प्रथम ही कारवाई करण्यात आली. त्यावर कंपनीने एफडीए आयुक्तांकडे सुनावणी मागितली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर राज्यभरातील सर्व मॅकडोनाल्ड रेस्तराँमध्ये कोकाकोला-झिरोची सुटी विक्री बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले. आदेशाची अमलजबजावणी न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज