अ‍ॅपशहर

'मातोश्री'चे निष्ठावंत 'शिवतीर्था'वर, शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीला

सदा सरवणकर हे मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार आहेत. त्यांनी शिंदे गटात उडी घेतल्याने आदित्य ठाकरेंनी 'सदा भाग चले' अशा शब्दात त्यांचा समाचार घेतला होता

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2022, 4:23 pm

हायलाइट्स:

  • सदा सरवणकर राज ठाकरेंच्या भेटीला
  • उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून सरवणकरांची ओळख
  • शिंदे गटात सहभागानंतर मनसेशी जवळीक
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत मानले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी धक्का देत शिंदे गटात उडी घेतली होती. त्यानंतर सदा सरवणकर चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने चर्चेला उधाण आलं आहे. सरवणकर यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान 'शिवतीर्थ'वर जाऊन भेट घेतली. शिंदे गटाचे दूत म्हणून सरवणकर राज ठाकरेंच्या भेटीला गेले का, असाही सवाल विचारला जात आहे.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिंदे गट मनसेत विलीन होणार असल्याची चर्चा होती, एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केल्याचंही बोललं जात होतं. मात्र त्या सर्व शक्यता मावळल्यानंतर शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर सरवणकरांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली आहे.

कोण आहेत सदा सरवणकर?

सदा सरवणकर हे मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार आहेत. त्यांनी शिंदे गटात उडी घेतल्याने आदित्य ठाकरेंनी 'सदा भाग चले' अशा शब्दात त्यांचा समाचार घेतला होता. तर शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेरील पोस्टरला काळे फासून त्यावर 'गद्दार' असे लिहिले होते.

हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारचं खाटेवाटप ठरलं? कोणाच्या वाट्याला कोणती खाती?

राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर काही नेत्यांनी त्यांची चौकशी करण्यासाठी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळेच सरवणकरही शिवतीर्थवर सदिच्छा भेटीसाठी गेल्याची माहिती आहे.


शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याची चर्चा होती. मात्र यात कुठलेही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण सरवणकरांनी दिलं. आगामी निवडणुकाबाबत विचारले असता, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे सरवणकर म्हणाले.

हेही वाचा : ...तर मी स्वतः दीपक केसरकरांचं अभिनंदन करेन, थोरातांचा 'जोरात' निशाणा

गेल्या काही दिवसात मनसे आणि भाजपची वाढती जवळीक पाहता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत नवी समीकरणं पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : शिंदे गटाची 'कापणी' करणाऱ्या भास्कर जाधवांची शेतात लावणी
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख