अ‍ॅपशहर

उच्चपदस्थांची अवैध ‘मैत्री’

राज्य सरकारच्या सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कलिना येथील ‘मैत्री गृहनिर्माण सहकारी संस्थे’त बांधण्यात आलेले अवैध मजले नियमित करण्यासाठी या प्रकरणाची फाइल ‘म्हाडा’ने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे पाठवली आहे.

Maharashtra Times 16 Mar 2017, 4:01 am
बांधकामे नियमित करण्यासाठी फाइल आयुक्तांकडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai maitri apartment illegal construction file to go to commissioner
उच्चपदस्थांची अवैध ‘मैत्री’


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारच्या सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कलिना येथील ‘मैत्री गृहनिर्माण सहकारी संस्थे’त बांधण्यात आलेले अवैध मजले नियमित करण्यासाठी या प्रकरणाची फाइल ‘म्हाडा’ने पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे पाठवली आहे. मुंबईतील अवैध बांधकामांवर कारवाईचा बडगा उचलणारे आयुक्त आता ‘मैत्री’चे अवैध मजले तोडणार की नियमांचा हवाला देत अधिकृत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या इमारतीत मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव प्रवीण दराडे, बिपिन श्रीमाळी, हर्षदीप कांबळे, सुधीर ठाकरे, अभिमन्यू काळे, दीपक कपूर, राजेश नार्वेकर, संजय यादव, जवाहर सिंग यांच्यासह ८४ अधिका‍ऱ्यांची घरे आहेत.

माहितीचा अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पालिका आणि म्हाडाकडे सांताक्रूझ पूर्व कालिना येथील सरकारी अधिका‍ऱ्यांच्या मैत्री सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घरांच्या बांधकामाची माहिती मागितली होती. म्हाडाने ४ फेब्रुवारी २०१० रोजी मेसर्स बी.जी. शिर्के या बिल्डरला एकूण २२६ सदनिका ३६.५० कोटी रुपये खर्च करून बांधण्याचे काम दिले होते. तसेच म्हाडाने निश्चित केलेल्या ७६ सदस्यांव्यतिरिक्त राज्य सरकारने मंजूर केलेल्या सदस्यांकरिता १५ सदनिका उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली. विंग ए साठी तीन तर विंग बी आणि सी साठी दोन मजल्यांची परवानगी असताना बिल्डर शिर्के यांनी १२ मजल्यांचे बांधकाम करून उर्वरित सात मजले अधिकृत करण्याची विनंती पालिकेला केली आहे.

गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांना पाठविलेल्या पत्रात इमारतीतील अवैध मजले तोडण्याची मागणी केली आहे. तसेच बिल्डर शिर्के आणि ८४ सदस्यांवर एमआरटीपीअंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.

सर्वच खात्यांचे अधिकारी

मुख्यमंत्री सचिवालयापासून उपमुख्यमंत्री कार्यालय, म्हाडा, एसआरए, गृहनिर्माण, ग्रामविकास, नगरविकास, सहकार, महसूल, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, सार्वजनिक आरोग्य, पालिका, सिडको, शिक्षण, जलसंपदा, कृषी, महिला व बालविकास, उद्योग, माहिती व तंत्रज्ञान, पोल‌सि, विक्रीकर, परिवहन या सरकारी विभागांतील अधिका‍ऱ्यांची घरे ‘मैत्री’ इमारतीत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अप्पर जिल्हाधिकारी ए.एम. वझरकर हे संस्थेचे मुख्य प्रवर्तक असून म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी अभिमन्यू काळे, पोल‌सि उपायुक्त सुनील रामानंद, गृहनिर्माण राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव कैलास पगारे आणि गृहनिर्माण विभागाचे उपसचिव व अप्पर जिल्हाधिकारी दिलीप शिंदे हे चार इतर प्रव‍र्तक आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज