अ‍ॅपशहर

मेट्रो ६चे काम ६६ टक्के पूर्ण; जोगेश्वरी व विक्रोळीला पवईमार्गे जोडणारी मार्गिका

मेट्रो ६ चे काम ६६ टक्के पूर्ण झाले आहे. ही मार्गिका जोगेश्वरी व विक्रोळीला पवईमार्गे जोडते.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 14 Feb 2023, 9:18 am
मुंबई : मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेचे काम ६६ टक्के पूर्ण झाले आहे. हा उन्नत मार्ग असल्याने महत्त्वाच्या पुलाचे काम ७१ टक्के पूर्ण झाले आहे. जोगेश्वरी व विक्रोळीला ही मार्गिका पवईमार्गे जोडते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम metro
मेट्रो ६चे काम ६६ टक्के पूर्ण; जोगेश्वरी व विक्रोळीला पवईमार्गे जोडणारी मार्गिका


मेट्रो ६ ही मार्गिका जोगेश्वरीजवळील स्वामी समर्थनगर ते विक्रोळीदरम्यान आहे. विक्रोळीला पूर्व द्रुतगती मार्गाजवळ ही मार्गिका संपते. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून ही मार्गिका उन्नत आहे. यामुळे 'मेट्रो २ अ'वरील लोअर ओशिवरा आणि मेट्रो ७वरील जोगेश्वरी पूर्व या सध्या सुरू असलेल्या मेट्रोशी या मार्गिकेची संलग्नता आहे. त्याखेरीज सध्या विकासपथावर असलेल्या मेट्रो ३ या भूमिगत मार्गिकेतील आरे कारशेड स्थानक आणि बांधकामाधीन असलेल्या मेट्रो ४ (कासारवडवली ते वडाळा) या मार्गिकेवरील विक्रोळी पश्चिमेकडील गांधीनगर स्थानकाशी तिची संलग्नता असेल. उपनगरीय रेल्वेच्या जोगेश्वरी व कांजुरमार्ग स्थानकांशी ही मार्गिका संलग्न असेल.

या प्रकल्पाची उभारणी एमएमआरडीएअंतर्गत महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कंपनी लिमिटेड (एमएमएमओसीएल) ही कंपनी करीत आहे. या कंपनीनुसार, मेट्रो ६ ही १५.३१ किलोमीटर लांबीची पूर्णपणे उन्नत मार्गिका आहे. उन्नत प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पुलाची उभारणी ७१ टक्के पूर्ण झाली आहे. तर यावरील १३ स्थानकांची उभारणी ५१.५० टक्के पूर्ण झाली आहे. प्रकल्पातील एस. एस. नगर ते महाकाली हा एकूण ४.७५० किमी लांबीचा मार्ग आहे. त्यापैकी २.५८ किमी रस्ते वाहतुकीसाठीचा उड्डाणपूल व ही उन्नत मार्गिका एकत्र असेल. वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका तर खालच्या बाजूला उड्डाणपूल, अशी रचना असून त्याचे कामदेखील प्रगतीपथावर आहे.

अखेरच्या गाडीच्या वेळेत बदल

अलीकडेच पूर्ण रूपात सुरू झालेल्या मेट्रो २ अ व ७च्या अखेरच्या फेरीची वेळ वाढविण्यात आली आहे. अंधेरी पश्चिमहून दहिसर पूर्वसाठी अखेरची फेरी आता रात्री १०.२०ऐवजी १०.३०ला असेल. त्याचप्रमाणे गुंदवली ते डहाणूकरवाडी (दहिसर पूर्व मार्गे) अखेरची फेरीदेखील १०.३०ला असेल. मात्र गुंदवली ते अंधेरी पश्चिम व अंधेरी पश्चिम ते गुंदवलीदरम्यान अखेरची फेरी रात्री ९.३० वाजताच असेल. तर दहिसर पूर्वेकडून डहाणूकरवाडीसाठी अखेरची फेरी रात्री ११.११ वाजता असेल. हा बदल १४ फेब्रुवारीपासून दोन महिन्यांसाठी लागू करण्याचा निर्णय एमएमएमओसीएलने घेतला आहे.

महत्वाचे लेख