अ‍ॅपशहर

​ हुल्लडबाज, तळीरामांवर होणार पोलिस कारवाई

होळी आणि धुलिवंदनाच्या आनंदावर अनुचित प्रकारांचे विरजण पडू नये म्हणून यावर्षी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.संवेदनशील भागांमध्ये पोलिसांच्या विशेष गाड्या गस्त घालणार असून, तळीरामांना आवर घालण्यासाठी विशेष नाकाबंदी मोहीमही हाती घेण्यात येणार आहे.

Maharashtra Times 11 Mar 2017, 2:53 am
रंगांच्या उधळणीला नियमांची वेसण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai police preapare to control hooligans during holi celebration
​ हुल्लडबाज, तळीरामांवर होणार पोलिस कारवाई


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

होळी आणि धुलिवंदनाच्या आनंदावर अनुचित प्रकारांचे विरजण पडू नये म्हणून यावर्षी सुरक्षेसाठी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांच्या विशेष गाड्या सतत गस्त घालणार असून, तळीरामांना आवर घालण्यासाठी विशेष नाकाबंदी मोहीमही हाती घेण्यात येणार आहे.

होळी आणि धुलिवंदनांच्या दिवशी महिलांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. महिलांवर रंग टाकणे, त्यांची छेड काढणे यावरून अनेकदा वादांना तोंड फुटते. विशेषतः रेल्वे, बस, एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांवर रंगाचे फुगे मारण्यात येतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांकडून प्लॅटफॅार्म आणि संवेदनशील भागांवर खास लक्ष ठेवले जाणार आहे. पोलिस साध्या वेशातही पाळत ठेवणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर, बिभत्स हावभाव करणाऱ्यांवर, रंगाने भरलेले फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने मोठ्या आवाजात स्पीकर लावू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. जबरदस्तीने होळीची वर्गणी गोळा करणे, पेट्रोल, अॅसिड, स्फोटक पदार्थ इत्यादींचा अनधिकृतरित्या साठा करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्याशिवाय महिलांचे गुड मॅार्निंग पथक, फिक्स पॉइंट आणि विशेष नाक्यांवर गस्त ठेवण्यात येणार आहे.

अनेकजण धुलिवंदनाच्या दिवशी गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ, मार्वे, आक्सा, गोराई, या समुद्रकिनारी जमा होतात. तेथे संबधित पोलिस ठाण्यांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

झाडे तोडणाऱ्यांना शिक्षा

होळीच्या निमित्ताने शहरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड केली जाते. मद्यधुंद असवस्थेत असलेल्यांकडून इतरांचे साहित्य होळीत नेऊन टाकण्याचेही प्रकार घडतात. अशी कृत्ये करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

होळीसाठी एसटीच्या जादा बस

होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जादा १०० बसेस सोडल्या आहेत. दरवर्षी एसटी महामंडळातर्फे होळीसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले जाते.

एसटीतर्फे मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, नेहरूनगर आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल येथून दापोली, गुहागर, देवरुख, खेड, कासेपेडांबे, शेवते, बुरुंबेवाडी, मेढे, पिंपळोलीसाठी बस सुटतील. तर परळ येथून खेड-दापोली, आंजले, मासरंग, भातगावसाठी बस रवाना होतील. कुर्ला-नेहरूनगर येथून गुहागर, चिपळूण, दापोलीसाठी बस जातील. या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र, खानदेश मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसीठी शुक्रवार आणि शनिवारी प्रत्येकी ५० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज