अ‍ॅपशहर

​ पर्यटनस्थळेही तापू लागली

राज्यातील थंड हवेची पर्यटनस्थळेही उन्हाच्या तडाख्यात भाजून निघाली असून महाबळेश्वर, अलिबाग, डहाणू व गोवा अशा पर्यटनस्थळांवरही उन्हाचा कडाका वाढल्याने पर्यटक बेजार झाले आहेत.

Maharashtra Times 14 Apr 2017, 4:01 am
महाबळेश्वरमध्येही पारा ३५ अंशांवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai tourist placec temparature rising
​ पर्यटनस्थळेही तापू लागली


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील थंड हवेची पर्यटनस्थळेही उन्हाच्या तडाख्यात भाजून निघाली असून महाबळेश्वर, अलिबाग, डहाणू व गोवा अशा पर्यटनस्थळांवरही उन्हाचा कडाका वाढल्याने पर्यटक बेजार झाले आहेत.

राज्याच्या बहुतांश भागात पाऱ्याने केव्हाच चाळीशी ओलांडली असून, तापमान कमी होण्याची शक्यता नाही. उलट पुढील दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व गोव्यात तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सुटीच्या दिवसांत पर्यटकांचा ओढा थंड हवेच्या ठिकाणी असतो, पण महाबळेश्वरसारख्या ठिकाणीही कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमध्ये ३५, डहाणू ३५, रत्नागिरी ३५ व गोव्यातील पणजीमध्ये ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले आहे. रायगड जिल्ह्यातील भीरा येथे सलग पाचव्या दिवशी ४५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गुजरातमधील कांडला येथेही तितकेच तापमान नोंदवण्यात आले.

मुंबईही तापू लागली

मुंबईत सध्या सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. आर्द्रताही वाढल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत. गुरुवारी सकाळी कुलाबा येथे ३५ तर सांताक्रूझ येथे ३४ अंश से. तापमानाची नोंद झाली. आज, शुक्रवारी मुंबईत सरासरी तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज