अ‍ॅपशहर

मुंबई विद्यापीठाचे कॅशलेस पाऊल

मुंबईसह देशभरात सुरू असलेल्या नोटा गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी कॅशलेस व्यवहाराला पसंती दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानेही कॅशलेस होत असल्याची घोषणा सोमवारी केली.

Maharashtra Times 30 Nov 2016, 8:09 am
स्कॉलरशिप, रीफंड आणि ओव्हरटाइमचे पैसे थेट खात्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai universitis step towards cashless
मुंबई विद्यापीठाचे कॅशलेस पाऊल


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईसह देशभरात सुरू असलेल्या नोटा गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी कॅशलेस व्यवहाराला पसंती दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानेही कॅशलेस होत असल्याची घोषणा सोमवारी केली. या निर्णयाद्वारे आता विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप, रीफंड, कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइम हे सर्व थेट संबंधितांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.

मुंबई विद्यापीठ डिजिटल करण्याच्या दृष्टीने कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. सध्या नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर कॅशलेस व्यवहाराला मिळणारी पसंती लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, कंत्राटदार यांची देयके यापुढे ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस’च्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. यापुढे ‘चेक सिस्टीम’ही बंद होणार आहे. परिणामी पैशांसाठी विद्यापीठात मारावे लागणारे खेटे वाचणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, रीफंड, बाहेरील प्राध्यापकांची लेक्चर, पेपर सेटिंग, पेपर असेसमेंट, विविध एजन्सीजच्या कंत्राटांचे पैसे थेट खात्यावर जमा केले जाणार आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थी-कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडे विहित नमुन्यात बँकेची माहिती आणि मॅनेजरच्या सही शिक्क्यासह अर्ज सादर करावा लागणार आहे.

या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठातील गैरव्यवहारही थांबणार असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून देण्यात आली. तर कंत्राटादारांकडून देण्यात येणारी टक्केवारीही आता बंद होईल का, अशी चर्चाही यावेळी ऐकू आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज